Mumbai Rain: विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाटासह मुंबापुरीला पावसाने झोडपले; नागरिकांची उडाली तारांबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 05:37 AM2021-10-07T05:37:39+5:302021-10-07T05:37:52+5:30
बुधवारी सकाळपासून दुपारपर्यंत मुंबईचे आकाश मोकळे होते. दुपारी बऱ्यापैकी कडक ऊन पडले असताना, मुंबईकरांच्या शरीरावरून घामाच्या धारा वाहत होत्या.
मुंबई : राजस्थानातून परतीच्या पावसाने आपला प्रवास बुधवारी सुरू केला असतानाच, दुसरीकडे मुंबई शहर आणि उपनगरात संध्याकाळी विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात पडलेल्या पावसाने पुन्हा एकदा मुंबईकरांची तारांबळ उडाली. विशेषतः घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर अनेक सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या अंबामातेच्या मूर्ती बुधवारी सायंकाळी, रात्री मंडपात दाखल होत असतानाच पावसाने जोरदार बरसात केली. त्यामुळे कार्यकर्त्यांची दमछाक झाल्याचे चित्र होते.
बुधवारी सकाळपासून दुपारपर्यंत मुंबईचे आकाश मोकळे होते. दुपारी बऱ्यापैकी कडक ऊन पडले असताना, मुंबईकरांच्या शरीरावरून घामाच्या धारा वाहत होत्या. सकाळी आणि दुपारी मुंबईत सर्वसाधारण अशीच परिस्थिती होती. मात्र, संध्याकाळी पाचनंतर मुंबईच्या आकाशात पावसाचे ढग दाटून आले. सायंकाळी पाच वाजता मुंबईच्या आकाशात दाटून आलेल्या ढगांनी पुरेपूर काळोख केला. सायंकाळी पाच वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत मुंबई ठिकाणी विजांचा कडकडाट सुरू होता. दक्षिण मुंबईपासून मध्य मुंबई आणि उपनगरात सर्वत्र संध्याकाळी सहानंतर पावसाची रिमझिम सुरू झाली. साडेसहा वाजण्याच्या सुमारास पावसाने आणखी जोर धरला. सात वाजता यात आणखी वाढ झाली. संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्रीचे आठ वाजेपर्यंत मुंबईत ठिकठिकाणी ढगांचा गडगडाट होत असतानाच, जोरदार पावसाच्या सरी बरसत होत्या.
ऐन पीक अवरला पाऊस दाखल झाल्याने, घरी जाणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. मुंबईच्या रस्त्यांवर वाहनांसोबत पाऊस धावत होता. मुंबईचे रस्ते पावसाने भरून वाहत होते. ऐन संध्याकाळी आणि रात्री दाखल झालेल्या पावसाने बाजारपेठांमध्ये गर्दी ओसरली होती, शिवाय पाऊस थांबेल, या आशेने मुंबईकर बराच वेळ आडोशाला उभे होते. मात्र, रात्रीचे आठ वाजले, तरीही पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता. रात्री सात वाजण्याच्या सुमारास उपनगरात बहुतांश ठिकाणी विजेचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुरू होता. याच काळात पावसाची सुरू असलेली रिमझिम मुंबईकरांच्या नाकीनऊ आणत होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, लाल बहादूर शास्त्री मार्ग, कुर्ला-अंधेरी रोड रस्ता अशा प्रमुख रस्त्यांवर पावसामुळे वाहनाचा वेग कमी झाला होता. रात्री आठच्या सुमारास पावसाचा वेग किंचित कमी झाला असला, तरीही आकाशात सुरू असलेला ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट मुंबईकरांना धडकी भरवत होता. रात्री उशिरा पावसाने किंचित उसंत घेतली.
देवी मंडपात आणताना कार्यकर्त्यांची दमछाक
मुंबई शहर आणि उपनगरात बुधवारी रात्री अनेक ठिकाणी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या अंबामातेच्या मूर्तींचे मंडपात आगमन होत होते. मात्र, हे आगमन होत असतानाच, पावसाने अनेक काळ अडथळा आल्याने कार्यकर्त्यांची दमछाक झाली होती. आगमनाच्या मिरवणुकीची परवानगी नसली, तरीही चारचाकी वाहने आणि इतर वाहनातून अंबामातेची मूर्ती मंडपात आणताना मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते पूर्णपणे पावसाने भिजले होते. मात्र, तरीही देवीच्या आगमनाचा उत्साह ठिकठिकाणी दिसत होता.