मुंबई : मुंबई आणि उपनगराला पावसाने अक्षरश: झोडपले आहे. ठिकठिकाणी पाणी गुडघाभर पाणी साचले असून वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. हवामान विभागाने अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून शासकीय कार्यालये आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या यंत्रणा सुरुच राहणार आहेत
दरम्यान, पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील विविध ठिकाणांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी मुंबई महापालिकाचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी महापालिकेद्वारे करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलरसू यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यानंतर आयुक्त इक्बालसिंह चहल वांद्रे पूर्व परिसरातील ओएनजीसी पातमुखाजवळील (ONGC outfall) भागाची पाहणी केली. तसेच, अंधेरी सबवेची पाहणी केली. याशिवाय, मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी विविध ठिकाणी पाहणी केली. कांदिवली येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावर आज सकाळी दरड कोसळली. या ठिकाणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी रस्त्यावर पडलेला मलमा त्वरित काढून रस्ता वाहतुकीस सुरळीत करण्याची सूचना मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना केल्या. तसेच संरक्षक जाळी लावून पहाड सुरक्षित करण्याचे निर्देशही महापौरांनी दिले आहेत. याशिवाय, श्रीकृष्ण नगर येथील पुलावरून महापौरांनी दहिसर नदीची पाहणी केली. या पुलावरून पाणी वाहून जात असल्यामुळे या पुलाचे रुंदीकरण तसेच मजबूतीकरण करण्याचे निर्देश महापौरांनी सहाय्यक आयुक्त यांना यावेळी दिले.
आज आणि उद्या मुंबई आणि उपनगरात हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केला आहे. येत्या 24 तासात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये अतिवृष्टीचा तर दक्षिण कोकणात पुढील 48 तासात जोरदार पावासाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून घरीच राहावे, असेही आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे करण्यात येत आहे.