मुंबई: सतत कोसळणाऱ्या पावसानं मुंबई महानगरपालिकेच्या सर्व दाव्यांची पोलखोल केली आहे. त्यामुळे यंदाच्या पावसातही मुंबईची तुंबई झाली. यावरुन विरोधकांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात पालिकेतील सत्ताधारी असलेल्या शिवसेनेला चांगलंच धारेवर धरलं. पालिकेत प्रशासक नेमा, प्रशासनाच्या आतापर्यंतच्या कामांची चौकशी करा, अशा मागण्या माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केल्या.
गेल्या काही तासांपासून मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुंबईच्या सखल भागांमध्ये पाणी साचलं. यावरुन विरोधकांनी विधिमंडळ अधिवेशनात पालिकेतील सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडलं. पालिकेवर प्रशासक नेमण्याची मागणी अजित पवारांनी केली. 'शिवसेनेचे आमदार, महापौर, पदाधिकारी नालेसफाई व्यवस्थित पूर्ण झाल्याचं सांगतात. मात्र तरीही नेहमी पहिल्याच पावसात मुंबई तुंबते. कारण नालेसफाईची काम कधीच नीट केली जात नाही,' असं अजित पवार म्हणाले.पालिकेच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणीदेखील पवार यांनी केली. 'दरवर्षी नालेसफाईचे दावे होतात. मात्र हे दावे फोल ठरतात. त्यामुळे पालिकेच्या आतापर्यंतच्या कामाची चौकशी होण्याची गरज आहे. या प्रकरणी महापौर जरी चुकत असेल, तरी तातडीनं कारवाई करा. वेळ पडली तर महापालिकेवर प्रशासक नेमा,' असं अजित पवार म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोणताही दबाव न बाळगता कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.