मुंबई - शहरासह उपनगरात पावसाचा जोर वाढला आहे. राज्यातही गडचिरोली, पुणे, ठाणे, बीडसह अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. लोणावळ्यात काही तासांत झालेल्या रेकॉर्डब्रेक पावसामुळे शहराला तलावाचं स्वरुप आलंय. याठिकाणी आलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी प्रशासनाचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. मुंबईतील पावसामुळे रेल्वे, रस्ते वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे.
मुंबईला मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढल्याने सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पावसासोबत जोरदार हवाही सुरू आहे. गुरुवारी दुपारी २.५१ वाजता हायटाइडची शक्यता आहे. मुंबईतील अंधेरी भागात पावसामुळे सबवे पाण्याखाली आला आहे. त्यामुळे याठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुढील काही तासांत मुंबई शहर व उपनगरात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा, तर काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
पावसामुळे शहर, उपनगरातील वाहतूक संथगतीने सुरू आहे. विलेपार्ले येथे वेस्टर्न हायवेवर वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून येते.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांपैकी एक विहार तलाव पहाटे ३.५० वाजता ओव्हर फ्लो झाला आहे.
पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने लोकांना पाण्यातून वाट काढून पुढे जावं लागत आहे. सांताक्रुझच्या कलिना भागातील हे दृश्य आहे.
मुंबईत सातत्याने होणाऱ्या पावसामुळे मीठी नदीच्या पाणी पात्रात वाढ झाली आहे.