Mumbai Rain Update ( Marathi News ) :मुंबईत काल बुधवारी सायंकाळपासून अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली.यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचून वाहतूक कोंडी झाली होती. सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे ऑफिसमधून घरी परतणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. दरम्यान, आता मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे.
गुरुवारी मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार आहेत. मुंबईकडे येणारी किमान १४ उड्डाणे वळवावी लागली. पावसाचा परिणाम मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेनसह रस्ते वाहतुकीवर झाला.
डोक्यातच गोळी का झाडली? सीआयडी करणार संजय शिंदेंची चौकशी
बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरांमध्ये संध्याकाळी ५ ते रात्री १० दरम्यान अनुक्रमे ८७.७९ मिमी, १६७.४८ मिमी आणि ९५.५७ मिमी पाऊस झाला. भांडुपमध्ये २७५ मिमी तर पवई परिसरात २७४ मिमी पाऊस झाला आहे. शिवडी कोळीवाडा आणि वडाळा परिसरात १४५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला.
बुधवारी दुपारपर्यंत पावसाचे वातावरण नव्हते. पण, सूर्यास्तापूर्वी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास दाट ढगांमुळे संपूर्ण मुंबईत अचानक अंधार झाला आणि सायंकाळी ६ वाजल्यापासून मुसळधार पाऊस सुरू झाला. हा पाऊस रात्रीपर्यंत सुरू होता. दरम्यान, आता मच्छिमारांनाही सूचना देण्यात आली आहे.
घाटकोपर, सायन, मुलुंड आदी स्थानकांवर रुळांवर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प झाली. स्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढली होती. डोंबिवलीतील कळंबा गावात पावसात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला.
हवामान विभागाने अलर्ट केला जारी
मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत काही ठिकाणी वादळी वारा आणि मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
हवामान खात्याने पालघर आणि सिंधुदुर्ग या किनारी जिल्ह्यांसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे, ज्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच विविध ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता आहे.
पुण्यातही शाळांना सुट्टी
पुणे : भारतीय हवामानशास्त्र विभाग मुंबई यांनी वादळ व विजेच्या कळकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या अतिदक्षतेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांना गुरुवारी (दि. २६) सप्टेंबर सुटी देण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत.