मुंबई - शहर आणि उपनगरात पडणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रस्ते वाहतूक कोलमंडली आहे. तर रेल्वे वाहतुकीवरही पावसाचा परिणाम झाला आहे. इतकचं नाही खुद्द शिवसेना पक्षप्रमुख राहत असलेल्या वांद्रे कलानगर भागातही पावसामुळे पाणी साचलं आहे. त्यामुळे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन विभागाला भेट देण्यासाठी उशीर झाला.
आदित्य ठाकरे यांनी आपत्कालीन विभागाला भेट देऊन मुंबईतील पावसाचा आढावा घेतला. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, मुंबईतील पाऊस हा नैसर्गिक आपत्ती आहे. महापालिकेची यंत्रणा नाही तर जगातील कोणतीही यंत्रणा अशा पावसासमोर हतबल होईल हे सत्य आहे. गेल्या तीन-चार दिवसात मुंबईत प्रचंड प्रमाणात पाऊस पडत आहे. महापालिका यंत्रणा आणि व्यवस्थापन कर्मचारी रात्रंदिवस काम करत आहेत. ही आपत्कालीन परिस्थिती आहे यासाठी पालिकेला दोष देऊन चालणार नाही असं त्यांनी सांगितले.
मुंबईत अनेक भागात खोदकाम सुरु असल्याने पाणी साचलं आहे. कलानगर आणि मातोश्री परिसरातही पाणी तुंबलं त्यामुळे सगळेच मुंबईकर पावसात अडकले तसेच मीही अडकलो. विविध ठिकाणी एका रात्रीत 400 मिमी पेक्षा अधिक पाऊस लागल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितले.
आवश्यक ठिकाणी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना आदित्य ठाकरेंनी मुंबई महापालिका प्रशासनाला दिल्या. वातावरणातील बदलामुळे अशी परिस्थिती मुंबईवर ओढावली आहे. ऑस्ट्रेलियातही अशाप्रकारे पुरपरिस्थिती आल्यास सर्व व्यवस्था फोल ठरते असं उदाहरण आदित्य ठाकरेंनी दिलं. आदित्य ठाकरे यांच्या अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्कालीन विभागाला भेट देत मुंबईतील पावसाचा आढावा घेतला.
सोमवारी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी "मुंबई कुठेही तुंबली नाही, मुंबईत सर्व काही आलबेल सुरु आहे. तुम्ही उगाच प्रश्न निर्माण करु नका" असं उत्तर पत्रकारांना दिलं होतं त्यावरुन सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. सोशल मिडीयातही मुंबईत पाणी साचल्यावरुन महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.