Mumbai Rain Update: विजांच्या कडकडाटासह मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस; अनेक भागातील रस्ते जलमय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 06:57 AM2021-07-18T06:57:23+5:302021-07-18T06:58:17+5:30
Mumbai Rain Update: मुंबई आणि उपनगरांतील अनेक भागांत विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.
मुंबई: शनिवारी दुपारनंतर उसंत घेतलेल्या पावसाने रात्री जोरदार हजेरी लावत मुंबईकरांची चांगलीच झोपमोड केल्याचे सांगितले जात आहे. मुंबई आणि उपनगरांतील अनेक भागांत विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. फोर्ट परिसर, कल्याण, भांडूप, अंधेरी, बोरिवली, कांदिवली या परिसराला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. ठाणे आणि रायगडमध्येही मेघगर्जनेसह मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याची माहिती मिळाली आहे. (mumbai rain update heavy rain lashes many parts of mumbai and suburban)
जोरदार पावसामुळे मुंबईतील हिंदमाता आणि अन्य सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली असून, मध्य मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, बोरिवली पूर्वेकडील शांतीवन भागात दहिसर नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे या भागात पूरसदृश्य परिस्थिती झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे वाहने वाहून जाताना दिसत आहेत.
#WATCH | Maharashtra: Rainwater entered Mumbai's Borivali east area following a heavy downpour this morning pic.twitter.com/7295IL0K5K
— ANI (@ANI) July 18, 2021
रेल्वे वाहतूक ठप्प
मध्यरात्री पडलेल्या पावसाचा परिणाम वाहतुकीवरही झाला असून, अनेक भागांतील वाहतूक विस्कळित झाली आहे. सीएसटीएमवरुन जाणाऱ्या अनेक एक्सप्रेस आणि मेल गाड्या रद्द करण्यात आल्या असून कल्याण-मुंबई लोकल सेवाही ठप्प झाली आहे. बाहेरून येणाऱ्या एक्सप्रेस गाड्या कल्याण स्टेशनवर थांबवण्यात आल्या आहेत. तसेच पनवेल-सीएसएमटी हार्बर मार्गावरील वाहतूकही ठप्प झाल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे कांदिवली पूर्व भागातही जोरदार पाऊस पडल्यामुळे रहिवासी भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. यामुळे नागरिकांची झोपमोड तर झालीच शिवाय संसार वाचवण्यासाठी धावपळही करावी लागल्याची माहिती मिळाली आहे. तसेच सायनचे गांधीमार्केट परिसरातही पाणी साचले आहे. सायनमध्ये पाणी साचल्याने या पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. दुसरीकडे मध्य रेल्वेच्या सायन स्थानकात मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी रेल्वे रुळांवर साचल्याचे पाहायला मिळत आहे.
#WATCH | Maharashtra: Daily commuters' movement affected as roads waterlogged, in Gandhi Market area following incessant rainfall. pic.twitter.com/1LpwYNVK0j
— ANI (@ANI) July 17, 2021
दरम्यान, मुंबईत गुरुवारी रात्रीपासूनच पावसाला सुरूवात झाली. तसेच राज्यातील विविध भागांत गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. गेले दोन दिवस रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने झोडपून काढले. ठाणे शहरातील काही भागात रस्ते पाण्याखाली गेले आहेत.