मुंबई - रात्रीपासून मुंबई शहरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. शहरातील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरले असून मालाड येथे भिंत कोसळून 18 जणांचा मृत्यू झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख राहत असलेल्या वांद्रे येथील कलानगर परिसरात पाणी साचल्याने तेथेही लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे विरोधकांनी शिवसेनेने करुन नाही तर भरुन दाखविले अशी टीका होत आहे.
यावर पाणी तुंबलंय की नाही याच्या राजकारणात न जाता, मुंबईकरांना तातडीने दिलासा कसा देता येईल हे पाहणं महत्त्वाचं आहे. नालेसफाई झाली नाही असं म्हणता येणार नाही. पावसाचं प्रमाण अत्यंत जास्त आहे, त्यामुळे नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तसेच हायटाईड असल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडचण होतेय असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेची पाठराखण केली आहे. मुख्यमंत्र्यांनी पालिकेच्या आपत्कालीन विभागाला भेट देऊन शहरातील व्यवस्थापनेचा आढावा घेतला. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मालाडमध्ये भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून 5 लाखांची मदत दिली आहे तसेच महापालिकेनेही 5 लाख द्यावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 3-4 तासात महिन्याचा पाऊस पडला, महापालिका प्रशासन रात्रभर काम करत आहे, ट्रॅफिक मॅनेजमेंट, पोलीस प्रशासन सर्वजण अहोरात्र काम करत आहे.
पुढचे 3-4 दिवस मुंबईसाठी धोक्याचे आहेत, आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याचे प्रशासनाला आदेश दिलेत. अनेक भागातील पाणी उपसण्याचे प्रयत्न सुरु आहेत, मध्य रेल्वे बंद आहे, प. रेल्वे सुरु आहे
तसेच हवामान खात्याच्या माहितीनंतर शाळांना सुट्ट्या दिल्या, हायटाईडमध्ये पाऊस आल्यास मुंबई आणखी तुंबण्याची भीती व्यक्त होतेय, त्याची खबरदारी घेऊन सुट्ट्या दिल्याआहेत, IMD च्या अंदाजाने 22 तासात पाऊस होईल, त्यामुळे खबरदारी घ्यावी लागेल असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान मुंबईत काल अनेक भागात 300 ते 400 मिमी पाऊस झाला, नेहमीच्या पावसापेक्षा तीन ते चार पट पाऊस, मालाड दुर्घटनेतील जखमींची मी भेट घेतली, घटना अत्यंत गंभीर, पाऊस पडून भिंत कोसळली असं त्यांनी सांगितले.