मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असणाऱ्या मुंबईकरांना पावसाने आज सकाळपासून मोठा दिलासा दिला आहे. शहरासह उपनगरात पावसाने हजेरी लावली आहे. मात्र सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे मुंबईतील रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक या दोन्ही सेवांवर परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यात पाणी साचल्याने वाहतुकीचा वेद मंदावला आहे. तर रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रेल्वे उशिराने धावत आहे.
हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक 10 ते 15 मिनिटे, पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेची वाहतूक सेवा 15 ते 20 उशिराने धावत आहेत. मुंबईतल्या अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाल्याने मुंबईच्या रस्ते वाहतुकीचा वेद मंदावला आहे. विक्रोळी, वडाळा, पवई या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गावरही वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. जोरदार पावसामुळे काही भागात जलमय झालेले आहे.
तर पुढील काही दिवस मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
मुंबईतल्या धारावी परिसरात पाणी साचल्याने याठिकाणीही वाहन चालकांना अडचणीचा सामना करावा लागला.
बोरिवली, मालाड, गोरेगाव, अंधेरी, मुलुंड, ठाणे, दादर अशा भागात मुसळधार पावसामुळे काही भागात पाणी साचलं आहे.