Mumbai Rain Update: गेल्या १२ तासात मुंबईत सर्वाधिक पावसाची नोंद; सखल भागात साचलं पाणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 10:10 PM2020-08-05T22:10:21+5:302020-08-05T22:10:45+5:30

सकाळी ८ ते सायंकाळी ८ या कालावधीत शहर भागात २१५.८ मिमी, पूर्व उपनगरात १०१.९ मिमी; तर पश्चिम उपनगरात ७६.०३ मिमी पाऊस, मरीन लाइन्स परिसरात सायंकाळी ४:१५च्या सुमारास वाऱ्यांनी गाठला तब्बल १०१.४ किलोमीटर प्रतितास वेग

Mumbai Rain Update: Mumbai receives maximum rainfall in last 12 hours | Mumbai Rain Update: गेल्या १२ तासात मुंबईत सर्वाधिक पावसाची नोंद; सखल भागात साचलं पाणी 

Mumbai Rain Update: गेल्या १२ तासात मुंबईत सर्वाधिक पावसाची नोंद; सखल भागात साचलं पाणी 

googlenewsNext

मुंबई - बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात आज यंदाच्या मोसमातील १२ तासातील सर्वाधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे. यामध्ये शहर परिसरात २१५.८ मिलीमीटर, पूर्व उपनगरांमध्ये १०१.९ मिलीमिटर; तर पश्चिम उपनगरांमध्ये ७६.०३ मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक‌ म्हणजे ३०९ मिलीमीटर पाऊस महापालिकेच्या 'डी' विभाग परिसरात नोंदविण्यात आला आहे. त्याचबरोबर बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात आज वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचाही सर्वाधिक वेग नोंदविण्यात आला. मरीन लाईन्स परिसरात दरताशी तब्बल १०१.४ किलोमीटर एवढा वाऱ्यांचा कमाल वेग सायंकाळी ४:१५ च्या सुमारास नोंदविण्यात आला. आजच्या अतिवृष्टीच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कामगार - कर्मचारी - अधिकारी अव्याहतपणे कार्यरत होते. 

आजच्या अतिवृष्टीच्या काळात बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील विविध सखल भागांमध्ये पाण्याचा निचरा तातडीने व्हावा, यासाठी पर्जन्य जलवाहिन्या विभागाची ६ उदंचन केंद्रे व २९९ ठिकाणी बसविण्यात आलेले तात्पुरते पाण्याचा उपसा करणारे संच सुसज्ज व कार्यतत्पर ठेवण्यात आले होते. या व्यवस्थेचा आवश्यकतेनुसार व वेळोवेळी वापर करण्यात आला. अग्निशमन दलास त्यांची पूर बचाव पथके आवश्यक त्या मनुष्यबळासह व साधनसामुग्रीसह ६ प्रादेशिक समादेशन केंद्रांवर तैनात आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या ३ तुकड्यांना अणीबाणी परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ मदतीकरिता तत्पर रहाण्याच्या देण्यात आलेल्या सूचनांनुसार त्या तुकड्या देखील कार्यतत्पर व सुसज्ज होत्या.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात जोरदार वाऱ्यांच्या तडाख्याने १४१ ठिकाणी झाडे उन्मळून पडली. ही झाडे महापालिकेच्या उद्यान विभागाद्वारे आणि आणि विभाग कार्यालयांच्या स्तरावर असणाऱ्या यंत्रसामग्रीरी द्वारे तात्काळ हटविण्यात आली आहेेत.अतिवृष्टीमुळे मध्य व पश्चिम रेल्वेची वाहतूक बंद झाल्याने अत्यावश्यक सेवेतील अनेक कर्मचारी विविध रेल्वेस्थानकांवर अडकून पडले होते. यांच्यासाठी तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था रेल्वे स्थानकांलगतच्या मनपा शाळांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली.

आज झालेल्या अतिवृष्टीच्या व सुरु असलेल्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व सहाय्यक आयुक्त, खातेप्रमुख, सर्व संबंधित अधिकारी यांनी सतर्क व कार्यतत्पर रहावे, असे आदेश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री इक्बाल सिंह चहल यांनी सर्व संबंधितांना दिले आहेत.

Web Title: Mumbai Rain Update: Mumbai receives maximum rainfall in last 12 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.