Mumbai Rain Update: मुुंबईत शहराच्या तुलनेत उपनगरात मुसळधार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 11:33 PM2019-07-27T23:33:36+5:302019-07-27T23:34:03+5:30
शुक्रवारी सायंकाळी सहा ते सातदरम्यान मुसळधार कोसळलेल्या पावसाने नंतर विश्रांती घेतली.
मुंबई : ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात मान्सूनने रौद्ररूप धारण केले असतानाच, मुंबईलाही शनिवारीही पावसाने चांगलेच झोडपले. शनिवारी सकाळच्या साडेआठच्या नोंदीनुसार, मुंबईत ३६.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरात पावसाचा जोर अधिक होता. शनिवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई, रायगड, ठाणे, नवी मुंबईकरांचे मेघाहाल झाले.
शुक्रवारी सायंकाळी सहा ते सातदरम्यान मुसळधार कोसळलेल्या पावसाने नंतर विश्रांती घेतली. रात्री दीड ते दोनच्या सुमारास पावसाने पुन्हा वेग पकडला. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट करत, शुक्रवारी मध्यरात्री उपनगरात पाऊस पुन्हा कोसळू लागला. शनिवारी पहाटेपर्यंत मुंबई शहर आणि उपनगरात तुरळक ठिकाणी पावसाने आपला मारा कायम ठेवला. शनिवारी सकाळी मात्र मुंबईत पावसाचा वेग किंचित कमी झाला. सकाळच्या वेळी अगदी तुरळक ठिकाणी रिमझिम कोसळत असलेला पाऊस शनिवारी दुपारी चांगलाच बरसला. उपनगरात ढगांनी केलेल्या काळोखामुळे नागरिकांना पुन्हा धडकी भरली. पूर्व उपनगरात पाऊस घेऊन आलेले हे ढग मनमुराद कोसळले.
मुंबई उपनगरात पावसाचा धिंगाणा सुरू असतानाच शहर मात्र कोरडे होते. शहरात काळ्याकुट्ट ढगांनी गर्दी केली असली, तरी कुठेतरी पडलेली तुरळक सर वगळता शहरात पावसाचे प्रमाण शनिवारी ५ वाजेपर्यंत कमीच होते. मात्र, शनिवारची सकाळ वगळता दुपारी पूर्व उपनगरातील सायन, कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर, साकिनाका, भांडुप, अंधेरी, गोरेगाव आणि बोरीवली परिसरात पावसाच्या अधूनमधून मुसळधार सरी कोसळत होत्या. शनिवारी दुपारी दोननंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतली. याच वेळी शहरातही पाऊस विश्रांतीवर असल्याचे चित्र होते.
दरम्यान, रविवार २८ जुलै रोजी पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या चार जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
उत्तर, दक्षिण कोकणात आज मुसळधार
उत्तर आणि दक्षिण कोकणात २८, २९, ३० आणि ३१ जुलै रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, पालघर आणि रायगडसह मुंबई जिल्ह्यांना पावसाचा फटका बसेल.
उत्तर मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात २८, २९, ३०, ३१ जुलै रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांनाही पावसाचा काहीसा फटका बसेल, अशी शक्यता हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे.
विमान वाहतुकीला लेटमार्क
मुसळधार पाऊस व खराब हवामानामुळे विमानांच्या वाहतुकीला सरासरी तासभर विलंब झाला. मुंबई विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या ३५३ विमानांना (७८ टक्के ) सरासरी अर्धा तास विलंब झाला. १७ विमानांचा मार्ग वळवला. मुंबईत उतरणाºया विमानांपैकी १८८ विमानांना (४२ टक्के) सरासरी २५ मिनिटांचा विलंब झाला. पावसामुळे टर्मिनल २ मध्येदेखील पाणीगळती होत होती. अनेक प्रवासी विमानात, विमानतळावर अडकून पडले होते. काही विमान कंपन्यांनी प्रवाशांना खाण्या-पिण्याची सुविधा पुरवली नसल्याने प्रवाशांमधून त्रागा केला जात होता.