मुंबई - शहरात रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. सायन- पनवेल महामार्गावर नेरुळ येथे उड्डाणपुलाखाली पाणी भरल्याने पुण्याकडे जाणारी वाहतूक संथगतीने सुरु आहे. नेरुळ ते सानपाडापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा आहेत, जोरदार पावसाने वाशी ,बेलापूर आणि ऐरोली भागतील बस डेपोमध्ये पाणी भरलं आहे.
सायन परिसरात आणि दादर येथील हिंदमाता परिसरात कमरेपर्यंत पाणी भरलं आहे. गांधी मार्केट, अंधेरी सबवे, वाकोला कुर्ला या सारख्या सखल भागात पाणी साचलं, तर इतर ठिकाणचे रस्ते जलमय झाले आहेत. मानखुर्द, गोवंडी, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, चेंबूर, भांडूप, मुलुंड या सखल भागात पाणी साचले आहे. वरळी, दादर, मुलुंड, भांडुप, कांजुर, विक्रोळीत रिमझिम पाऊस पडत आहे.
मुंबई सांताक्रुज वेधशाळेनुसार गेल्या २४ तासात ९२.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर कुलाबा वेधशाळेनुसार गेल्या २४ तासात ७८.५ मिमी पावसाची नोंद आहे. सायन-माटुंगा रस्त्यावरही पाणी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. तर वडाळा येथील फ्री वेवरही वाहतुकीची कोंडी झाली आहे.रस्ते वाहतुकीसोबतच रेल्वे वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे.
अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे या तिन्ही रेल्वे सेवांवर मुसळधार पावसामुळे परिणाम झाला आहे.
मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक मार्गावर जामरुंग रेल्वे स्थानकाजवळ पहाटे 4.30 च्या सुमारास मालगाडी घसरली, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली मात्र या घटनेमुळे डाऊन आणि मिडल लाईनवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे, तर मुंबईकडे येणारी वाहतूक सुरु आहे. मालगाडी घसरल्याने सीएसएमटी – पुणे इंटरसिटी एक्सप्रेस, सीएसएमटी-पुणे इंद्रायणी एक्सप्रेस, सीएसएमटी – कोल्हापूर कोयना एक्सप्रेस, सीएसएमटी -पुणे डेक्कन एक्सप्रेस, भुसावळ – पुणे एक्सप्रेस, पुणे – भुसावळ एक्सप्रेस, पुणे -पनवेल पॅसेंजर, पुणे सीएसएमटी डेक्कन क्वीन, पुणे सीएसएमटी प्रगती एक्सप्रेस या ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत.