मुंबई - ऐन गर्दीच्या वेळी मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका बसला आहे. पावसामुळे कर्जत-खोपोली रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकलचा खोळंबा झाला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक 40-45 मिनिटे उशिराने सुरू आहे. मध्य रेल्वेवर सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल कुर्ला स्थानकात रखडल्या आहेत. सायन-माटुंगा रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचले आहे.
मुंबईत पहाटेपासून जोरदार पाऊस पडत आहे. मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. माटुंगा, वरळी, लालबाग, लोअर परेल परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे, पुर्व आणि पश्चिम उपनगरात मुसळधार पावसाने मुंबईकरांचे हाल झालेत. तर ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरात जोरदार पाऊस पडत आहे.
मुसळधार पावसामुळे पालघर जलमय झालं आहे, जिल्ह्यात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. दक्षिण गुजरात तसेच पालघर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असल्याने पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. पश्चिम रेल्वेवर मरीन लाईन्स स्टेशनजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने मरीन लाईन्स-चर्चगेट वाहतूक ठप्प झाली आहे. हार्बर रेल्वेवर मानखुर्द-चुनाभट्टीजवळ ट्रॅकवर पाणी साचलं आहे त्यामुळे येथील लोकल 30 मिनिटे उशिराने धावत आहेत.
पावसाचा जोर कायम असल्यानं रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल वाहतूक संथ गतीनं सुरू आहे. याशिवाय या दोन्ही मार्गांवरील अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. कर्जतजवळील घाट परिसरातील जामरुंग व ठाकूरवाडी स्थानकादरम्यान मालगाडीचे काही डबे घसरल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
दक्षिण गुजरात तसेच पालघर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असल्याने पश्चिम रेल्वे ची सेवा विस्कळीत झाली आहे.गुजरात,डहाणू वरून मुंबई कडे जाणारी फ्लाईग राणी एक्सप्रेस (8.25 वाजता) ,वलसाड फास्ट पॅसेंजर (7.10) दिवा-वसई मेमो (8),डहाणू-पनवेल मेमो (6.02),डहाणू-अंधेरी लोकल (5.16), सूरत-विरार शटल (9.31), यांच्यासह चर्चगेट वरून डहाणू कडे जाणाऱ्या चर्चगेट डहाणू(6.48 वाजता) (7.26 वाजता), विरार डहाणू(6.08) आदी अनेक गाड्या रद्द करण्यात आल्याने मुंबई आणि गुजरात कडे जाणाऱ्या चाकरमानी, विद्यार्थ्यांचे हाल झाले.
या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस, एलटीटी-मनमाड एक्स्प्रेस, मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस, मुंबई-कन्याकुमारी एक्स्प्रेस, साईनगर शिर्डी-दादर एक्स्प्रेस, कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस, हावडा-मुंबई एक्स्प्रेस, अमरावती-मुंबई एक्स्प्रेस, सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेस, कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस, कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस, मडगाव-दादर जनशताब्दी एक्स्प्रेस.
पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. सायन- पनवेल महामार्गावर नेरुळ येथे उड्डाणपुलाखाली पाणी भरल्याने पुण्याकडे जाणारी वाहतूक संथगतीने सुरु आहे. नेरुळ ते सानपाडापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा आहेत, जोरदार पावसाने वाशी ,बेलापूर आणि ऐरोली भागतील बस डेपोमध्ये पाणी भरलं आहे. सायन परिसरात आणि दादर येथील हिंदमाता परिसरात कमरेपर्यंत पाणी भरलं आहे. गांधी मार्केट, अंधेरी सबवे, वाकोला कुर्ला या सारख्या सखल भागात पाणी साचलं, तर इतर ठिकाणचे रस्ते जलमय झाले आहेत. मानखुर्द, गोवंडी, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, चेंबूर, भांडूप, मुलुंड या सखल भागात पाणी साचले आहे. वरळी, दादर, मुलुंड, भांडुप, कांजुर, विक्रोळीत रिमझिम पाऊस पडत आहे.