यावेळीही पावसाने 'करून दाखवलं'; 'मातोश्री'जवळ पाणीच पाणी!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2019 09:20 AM2019-07-02T09:20:54+5:302019-07-02T09:23:55+5:30
उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानाजवळ गुडघाभर पाणी
मुंबई: सततच्या पावसानं मुंबई महापालिकेच्या नालेसफाईच्या दाव्यांची अक्षरश: पोलखोल केली. जवळपास संपूर्ण जून महिना दडी मारल्यानं काही दिवसांपूर्वीच राज्यात पावसाचं दमदार आगमन केलं. पावसाच्या बॅटिंगमुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचलं. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं. महापालिकेतील सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानाजवळदेखील पाणी साचलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे हिंदमाता, सायन सर्कलसह अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याच्या घटना घडल्या. आता वांद्र्यातील कलानगरमध्येदेखील गुडघाभर पाणी साचलं आहे. विशेष म्हणजे मातोश्री बंगल्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भागात तुंबलं आहे. या भागात सकाळी नऊपर्यंत पालिकेचे कर्मचारी पोहोचलेले नव्हते. याशिवाय पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणतीही यंत्रणादेखील उपलब्ध नाही.
नालेसफाईचं काम व्यवस्थित झाल्यानं यंदा मुंबईत पाणी तुंबणार नाही, असा दावा पालिकेनं केला होता. मात्र पावसानं अवघ्या आठवड्याभरात हा दावा फोल ठरवला. मुंबईतील अनेक भागांमध्ये सध्या पाणी साचलं आहे. कुर्ला, वांद्रे, हिंदमाता, सायन सर्कल, वडाळा जंक्शन, चुनाभट्टी, वाकोला भागात पाणी तुंबल्यानं वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत.