मध्यरात्रीपासून मुंबई परिसरात सहा तासांत तब्बल ३०० मिमी पाऊस कोसळला आहे. यामुळे रेल्वे ट्रॅक, रस्त्यांवर पाणी साचले आहे. यामुळे मुंबईची लाईफलाईन बंद पडली आहे. अशातच लाखो नोकरदार वाटेतच अडकले आहेत. अर्थात हे मुंबईकरांसाठी नवे नसले तरी होणारा त्रास पहाता यापासून केव्हा सुटका होईल याचीच वाट मुंबईकर पाहत आहे.
मुंबईवर एवढा पाऊस अचानक कसा काय कोसळला याचे कारण हवामान विभागाने सांगितले आहे. दक्षिण कोकणावर ज्या पद्धतीने कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते आणि त्यामुळे तिकडे मुसळधार पाऊस पडला होता. त्याच पद्धतीने उत्तर कोकणावर देखील कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आणि या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे रविवारी रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत मुंबई महानगर प्रदेशात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आली आहे.
पाऊस एवढ्यावरच थांबणार नाहीय, तर दुपारी १.५७ मिनिटांनी समुद्राला भरती आहे. यामुळे पावसाचे पाणी मुंबईतच साचण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून पाण्यासाठी विवंचनेत असलेल्या मुंबईला पावसाने धो-धो धुतले आहे. दिल्लीनंतर मुंबईवर वरुणराजाची वक्रदृष्टी पडली आहे. एकट्या मुंबईवरच नाही तर शेजारच्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्गमध्येही सगळीकडे पूरच पूर झाला आहे. अशातच पुढील चार दिवस मुसळधार पावसाचे असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
समुद्राला उधाण येणार असल्याने पुढील तीन-चार तास मुंबईकरांसाठी महत्वाचे आहेत. रेल्वे स्थानकांवर लाखो मुंबईकर अडकलेले आहेत. मिळेल त्या वाहनाने एकतर ऑफिस किंवा घर गाठण्याचा त्यांचा प्रयत्न होता. परंतू, रेल्वेसेवाच ठप्प झाल्याने आपत्ती नियोजन मंत्र्यांनाही रेल्वे रुळावरून चालण्याची वेळ आली आहे.
या भागात ऑरेंज अलर्ट जारीहवामान विभागाने दिलेल्या अलर्टनुसार पुढचे पाच दिवस दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, अंतर्गत कर्नाटक, मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने रविवारी दिली. तसेच मध्य महाराष्ट्रात ९ ते ११ जुलै दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. ८ जुलै रोजी मध्य महाराष्ट्रातील घाट भागात अतिवृष्टीचा अंदाज विभागाने वर्तवला आहे.