Mumbai Rain Updates: मुंबई, ठाण्यात पावसाची जोरदार हजेरी; अंधेरी सब-वे बंद, अनेक ठिकाणी ट्राफिक जाम, लोकल सेवा सुरळीत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 05:15 PM2022-10-07T17:15:32+5:302022-10-07T17:17:09+5:30
मुंबई शहर आणि उपनगरासह ठाणे परिसरात आज पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. गेल्या तीन ते चार तासांपासून मुंबई आणि उपनगर परिसरात पावसाचा जोर असून सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.
मुंबई-
मुंबई शहर आणि उपनगरासह ठाणे परिसरात आज पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. गेल्या तीन ते चार तासांपासून मुंबई आणि उपनगर परिसरात पावसाचा जोर असून सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. अंधेरी सब-वे पाणी साचल्यानं वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अंधेरी मार्केटमध्ये पाणी साचल्याने भुयारी मार्ग बंद आहे त्यामुळे वाहतूक गोखले रोडने वळवली आहे.
मुंबई शहरात दादर, महालक्ष्मी, वरळी, मरिन लाइन्स, चर्चगेट, पेडर रोड परिसरातही जोरदार पाऊस कोसळत आहे. महालक्ष्मी, पेडर रोड, आरटीआय, विनोली येथे उत्तरेकडे जाणारी वाहनांची गती मंदावली आहेत. त्यामुळे ट्राफिक जाम जाल्याची परिस्थिती काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. चाकरमान्यांची लाइफलाइन असलेली मुंबईची लोकल सेवा मात्र सुरळीत सुरू आहे. पण पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास लोकल सेवेवरही परिणाम पाहायला मिळू शकतो.
आज सकाळपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये जोरदार पाउस कोसळत होता. संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत डोंबिवलीत १२१.५ mm पावसाची नोंद झाली आहे. तर ठाणे-कल्याण भागात ७० ते १०० एमएम पाऊस झाला आहे. मुंबई शहरात ७० ते १०० एमएम आणि उपनगरात ४०-७० एमएम पावासाची नोंद झाली आहे.
राज्यात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावासाच अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दुसरीकडे लातूरमध्येही पावसाची संततधार सुरू आहे. किल्लारी, औसा, निलंग्यात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. संततधार पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. काढणीला आलेला सोयाबिन धोक्यात आला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"