मुंबई - मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलं असून रस्ते वाहतुकीला फटका बसला आहे. मुंबईत रात्रीपासूनच पावसाची जोरदार बॅटींग पाहायला मिळत आहे. याचाच मोठा फटका मध्य रेल्वेला बसला आहे. पावसामुळे ठाण्याच्या पुढची रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकलचा खोळंबा झाला आहे. कर्जत-खोपोली, कसाऱ्याकडून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल या फक्त ठाण्यापर्यंत सुरू असून पुढे रद्द करण्यात आल्या आहेत.
भांडुप रेल्वे स्थानकात रेल्वे रुळांवर पाणी साचलं आहे. तसेच कुर्ला-मानखुर्द स्थानकातही रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये दमदार पाऊस सुरू आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीचा वेगदेखील मंदावला आहे. सध्या मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. माटुंगा, दादर, वरळी, लालबागमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे.
पश्चिम उपनगरात देखील पावसाचा जोर वाढला आहे. वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, दहिसरमध्ये पाऊस सुरू आहे. भांडूप, घाटकोपर, ठाण्यात पावसाची तुफान बॅटिंग पाहायला मिळत आहे. नवी मुंबईतही जोरदार पाऊस आहे. येत्या 24 तासांमध्ये मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा, मुंबई आणि काही भागात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मुंबई महानगरात काल मध्यरात्रीनंतर १ वाजेपासून ते आज सकाळी ७ वाजेपर्यंत या सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी ३०० मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. काही सखाल भागांमध्ये जोरदार पावसामुळे पाणी साचले आणि उपनगरीय रेल्वे सेवा देखील विस्कळीत झाली आहे. आज देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांच्या पहिल्या सत्रासाठी सुटी जाहीर करण्यात येत आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील सत्रांसाठीचा निर्णय जाहीर करण्यात येईल. पालिकेने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे.