Mumbai Rain Updates : मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस; रस्ते, रेल्वे वाहतुकीला फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 08:49 AM2019-09-03T08:49:05+5:302019-09-03T08:58:38+5:30
मुंबईसह उपनगरांत मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे
मुंबई - मुंबईसह उपनगरांत मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई आणि पालघरमध्ये देखील मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसाच्या फटका हा रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला बसला आहे. पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्यानं रस्ते वाहतुकीचा वेगदेखील मंदावला आहे. तसेच मध्य रेल्वेवरील लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू आहेत.
मुंबई आणि महाराष्ट्रातील बर्याच भागांत गणेश चतुर्थीच्या सणाची सुरुवात पावसाने झाली. पावसामुळे राज्यातील बहुतांश भागातील हवामान सुखद झाले आहे. गेल्या 24 तासांत कोकण आणि गोवा येथे गडगडाटासह चांगला पाऊस झाला असून मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली. तसेच मराठवाड्यातील परभणी, नांदेड आणि बीड जिल्ह्यात देखील चांगला पाऊस पडला आहे. स्कायमेटकडे उपलब्ध असलेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत रविवार सकाळी साडेआठपासून हर्णेमध्ये 91 मिमी, डहाणूमध्ये 51 मिमी,वेंगुर्लामध्ये 48 मिमी, ब्रह्मपुरीमध्ये 45 मिमी आणि रत्नागिरीमध्ये 43 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
Expect a few on and off moderate spells to continue with isolated heavy spells over #Mumbai and suburbs for the next 48hrs. These #MumbaiRains might lead to waterlogging and traffic disruption. #MumbaiRainsLive#MumbaiTraffic#MumbaiRain#MumbaiWeatherhttps://t.co/zAvWVHU8qc
— SkymetWeather (@SkymetWeather) September 3, 2019
स्कायमेट हवामान तज्ज्ञांनी पुढील दोन दिवस विदर्भातील काही भागात एक ते दोन मुसळधार सरींसह मध्यम पाऊस आणि मराठवाड्यात मध्यम सरी बरसण्याचा अंदाज वर्तविला आहे. दरम्यान, कोकण आणि गोवा येथे मध्यम ते मुसळधार पाऊस सुरू राहील. या कालावधीत मुंबईत एक किंवा दोन मध्यम सरींची शक्यता आहे, परंतु मुसळधार पावसाची कोणतीही शक्यता नाही.
मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्वर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि नाशिकसारख्या ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी बरसतील. पुढील दोन ते तीन दिवस हवामान ढगाळ व आरामदायक राहील. या सर्व हवामान परिस्थितीचे श्रेय गुजरातमधील चक्रवाती परिभ्रमणाला दिले जाऊ शकते. याव्यतिरिक्त, महाराष्ट्र किनारपट्टीवरील कमकुवत ट्रफ रेषेमुळे मान्सून ची सक्रिय अवस्था आहे. स्कायमेटच्या आकडेवारीनुसार 1 जून ते 1 सप्टेंबर दरम्यान मराठवाड्यातील पावसाची 21% कमतरता वगळता महाराष्ट्रातील अन्य सर्व हवामान विभागांमध्ये पावसाचे आधिक्य आहे.