Join us

मुंबईत मुसळधार पावसाचे थैमान; लोकलवर परिणाम, ३-४ तासांत जोर वाढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 8:49 AM

Mumbai Rain: मुंबईत रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांची सकाळ त्रासदायक ठरत आहे.

Mumbai Rain Updates :मुंबईत बुधवारी रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या ६-७ तासांपासून पावसाची संततधार सुरु असल्याने शहरातील अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मालाड, गोरेगाव, सांताक्रूझ, जुहू, वांद्रे, कुर्ला आणि घाटकोपर भागात काही प्रमाणात रस्ते पाण्याखाली गेले आहेत. मुंबईत रात्रीपासून सुरु असलेल्या तुफान पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल १० ते १५ मिनिटे उशीराने धावत आहेत. त्यामुळे असाच पाऊस सुरु राहिल्यास रेल्वेची वाहतूक काही प्रमाणात ठप्प होण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या ३-४ तासांत मुंबईच्या काही भागात ५०-६० किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह मध्यम ते तीव्र पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे अंधेरीमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे अंधेरी सबवे वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच येत्या काही तासांत दादर, वरळी, वांद्रे, महालक्ष्मी, कुर्ला, बीकेसी, चेंबूर, घाटकोपर येथे सर्वात जास्त पाऊस पडणार असून ज्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता आहे. 

भारतीय हवामान खात्याने गुरुवारी कोकण, मध्य महाराष्ट्रात अत्यंत मुसळधार पावसासह रेड अलर्ट जारी केला आहे. तर प्रादेशिक हवामान केंद्राने मुंबईत आज यलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय  ठाणे, पालघर, पुणे, कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानुसार पहाटेपासूनच जोरदार पाऊस सुरु झाला आहे. तसेच मुंबईतही आकाशात ढग दाटून आल्याने पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. 

दुसरीकडे, हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केल्यानंतर  पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये आज बंद राहतील अशी  माहिती पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे. ठाण्यातही शाळांना सुट्टी जाहीर जाहीर करण्यात आली आहे.

पुढील दोन आठवडे दमदार पावसाची शक्यता

मुंबईत पुढील दोन आठवड्यांमध्ये मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 'स्कायमेट'ने पुढील दोन आठवडे पडणाऱ्या अंदाज वर्तवला आहे. २६ आणि २७ जुलै रोजी विजांच्या कडकडाटासहीत मुंबईमध्ये पाऊस पडेल असा अंदाज आहे. २८ जुलै रोजी पाऊस विश्रांती घेईल असा अंदाज आहे. तर २९ जुलै म्हणजेच सोमवारी रविवारच्या तुलनेत कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ३० जुलैपासून पुढील ९ दिवस जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस मुंबईकरांना पहायला मिळेल असा अंदाज आहे. ३१ जुलै रोजीही मुंबईमध्ये विजांच्या कडकडाटासहीत पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

 

टॅग्स :पाऊसमुंबईहवामानमध्य रेल्वे