मुंबई - मुंबईसह उपनगरात सकाळपासून जोरदार पाऊस कोसळत होता. अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसाचा फटका हा रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला देखील बसला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईची मध्य रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सायन - कुर्ला - चुनाभट्टीदरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने सर्व मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. सायन, कुर्ला आणि चुनाभट्टी रेल्वे स्थानकाच्या ट्रॅकवर साचलेल्या पाण्याचा अद्याप निचरा न झाल्याने सीएसएमटी ते ठाणे आणि सीएसएमटी ते वाशी रेल्वे सेवा बंद असून दोन तासांनंतर ट्रॅकवरील पाण्याचा निचरा झाल्यास सीएसएमटी ते ठाणे लोकल सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली. ठाण्यापुढे मध्य रेल्वेची वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे.
ठाणे ते कसारा, कर्जत वाहतूक सुरू आहे. मध्य रेल्वेपाठोपाठपश्चिम रेल्वेची वाहतूक देखील विस्कळीत झाली होती. हार्बर मार्गावरील वाशी ते सीएसएमटी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. नालासोपारा स्टेशनवर रुळावर पाणी साचलं आहे. नालासोपारा रेल्वे स्थानकात रुळावर पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प झाली आहे. पुढील 48 तास पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगडमध्ये हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.