मुंबई - मुंबईसह उपनगरांत जोरदार पाऊस कोसळत आहे. अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसाचा फटका हा रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला देखील बसला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईची मध्य रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सायन-माटुंगा दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने जलद मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच विक्रोळी-कांजुरमार्गदरम्यान पाणी साचल्याने धिम्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
ठाणे ते कसारा, कर्जत वाहतूक सुरू आहे. मध्य रेल्वेपाठोपाठपश्चिम रेल्वेची वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे. हार्बर मार्गावरील वाशी त सीएसएमटी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. नालासोपारा स्टेशनवर रुळावर पाणी साचलं आहे. नालासोपारा रेल्वे स्थानकात रुळावर पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प झाली आहे. वसई-विरार दरम्यान रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई आणि पालघरमध्ये देखील मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील 48 तास पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगडमध्ये हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आपत्ती विभाग व्यवस्थापनाला आणि इतर विभागांना दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जोरदार पावसामुळे मुंबई, ठाणे, कोकण परिसरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने आज मुंबई, कोकण आणि ठाण्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. तसेच राज्यातील शाळांना पावसाची परिस्थिती पाहून स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना सुट्टी जाहीर करण्याबाबत निर्देश शेलार यांनी दिले आहेत.
ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई आणि पालघरमध्ये देखील मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसाच्या फटका हा रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला देखील बसला आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्यानं रस्ते वाहतुकीचा वेगदेखील मंदावला आहे. वेस्टर्न आणि इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक संथगतीने सुरू आहे. पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.
मान्सूनच्या परतीचा महिना म्हणून ओळख असलेल्या सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच मान्सूनने रौद्र रूप धारण केले आहे. गेल्या 24 तासांपासून मुंबई, ठाणे, नवी आणि रायगडमध्ये मान्सूनने तुफान फटकेबाजी केली आहे. विशेषत: मुंबईत तुफान पाऊस कोसळला असून, येथे 131 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पुढील 2 ते 3 दिवस मान्सून राज्यभर सक्रिय राहील. विशेषत: कोकण आणि मध्य महाराष्ट्रावर मान्सूनचा जोर राहील. मराठवाड्यातही सरी कोसळतील. गुरुवारनंतर मात्र मान्सूनचा जोर कमी होईल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे. बंगालच्या उपसागरावर व त्या लगतच्या ओडिशाच्या किनारपट्टीवर सलग सातवे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरासह लगतची ओडिशाची किनारपट्टी आणि पश्चिम बंगालवर ते स्थित आहे. परिणामी, मध्य आणि पूर्वेकडील भागात मान्सून सक्रिय झाला आहे.