पहिल्याच मुसळधार पावसात मुंबई तुंबली आहे. रेल्वे बंद पडली आहे, रस्ते पाण्याचे तुडूंब झाले आहेत. मध्यरात्री १ ते सकाळी ७ या काळात ३०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. हे पाणी समुद्रात घेतले जात नाहीय, तोच एक धडकी भरविणारी माहिती येत आहे. दुपारी दोनच्या सुमारास समुद्राल भरती येणार आहे. यामुळे हे पावसाचे पाणी उलटे मुंबईत घुसणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून पाण्यासाठी विवंचनेत असलेल्या मुंबईला पावसाने धो-धो धुतले आहे. दिल्लीनंतर मुंबईवर वरुणराजाची वक्रदृष्टी पडली आहे. एकट्या मुंबईवरच नाही तर शेजारच्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्गमध्येही सगळीकडे पूरच पूर झाला आहे. अशातच पुढील चार दिवस मुसळधार पावसाचे असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
समुद्राला उधाण येणार असल्याने पुढील तीन-चार तास मुंबईकरांसाठी महत्वाचे आहेत. रेल्वे स्थानकांवर लाखो मुंबईकर अडकलेले आहेत. मिळेल त्या वाहनाने एकतर ऑफिस किंवा घर गाठण्याचा त्यांचा प्रयत्न होता. परंतू, रेल्वेसेवाच ठप्प झाल्याने आपत्ती नियोजन मंत्र्यांनाही रेल्वे रुळावरून चालण्याची वेळ आली आहे.
मुंबईत पाण्याचा निचरा होणे कठीण दिसत आहे. कारण वरून पाऊस कोसळत आहे व हे पाणी ज्या समुद्रात विसावते तो समुद्रही थोड्याच वेळात उधाणणार आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे विरोधक नाले सफाईत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत आहेत. गेल्या वर्षीपर्यंत नालेसफाईची जबाबदारी ठाकरे शिवसेनेवर होती. परंतू, महापालिका निवडणूक झालेली नसल्याने प्रशासक नेमण्यात आला असून पर्यायाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अधिकारात ही नालेसफाई करण्यात आली आहे. यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत.