पहिल्याच पावसात मुंबई आणि उपनगरांत साचलेल्या पाण्यावरुन भाजपनं सत्ताधारी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुंबईतील नालेसफाईच्या दाव्यावर बोट ठेवत पालिकेकडून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.
मुंबईत पाणी तुंबणार नाही, असा दावा केलाच नव्हता; महापौर किशोरी पेडणेकरांचं विधान
"मुंबईत दरवर्षीप्रमाणे पाणी तुंबलंय.. घरात पाणी घुसू लागलंय. नालेसफाई कधी 107%..कधी 104%... दाव्यांचे आकडे मोठे-मोठ्याने "वाझे". पहिल्या पावसातच "कटकमिशन"चे सगळे व्यवहार उघडे! मुंबईकर हो सत्ताधीशांचा हा वसूलीचा नाद खुळा. नेमेची येतो पावसाळा...पाच वर्षांत 1 हजार कोटींचा घोटाळा!!", असं ट्विट आशिष शेलार यांनी केलं आहे.
मुंबई आणि परिसरात काल रात्रीपासूनच संततधार सुरू असून सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. यात दादर येथील हिंदमाता, माटुंगा आणि सायन परिसरात पाणी साचलं आहे. याशिवाय रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं मध्य आणि हार्बर रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. मुंबईतील नालेसफाईबाबत पालिकेल्या केलेल्या दाव्यावरुन आशिष शेलार यांनी सत्ताधारी शिवसेनेवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटवर एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. यात त्यांनी महापालिकेच्या कारभाराची पोलखोल केली आहे.
"डेब्रीजच्या गोण्या जशाच्या-तशा नाल्यात. पावसाचे पाणी मुंबईकरांच्या घरात...आणि मलाईच्या गोण्या मात्र कंत्राटदारांच्या खिशात! आता तरी मुंबईकरांची खरी काळजी करा!", असं कॅप्शन देत शेलारांनी व्हिडिओ ट्विट केला आहे.
"पहिल्याच पावसात मुंबई तुंबली. दुर्दैवाने मुंबईकरांचा जीव टांगणीला पडला. १०४ टक्के, १०७ टक्के नालेसफाईचा दावा फोल ठरला. प्रशासनानं लक्ष न दिल्यानं कंत्राटदारानं पळ काढला. सत्ताधाऱ्यांनी कंत्राटदारांनी केलेल्या कृत्यावर पांघरुण घातलं. संपूर्ण मुंबईमध्ये दरवर्षाला जवळजवळ ७० ते १०० कोटी रुपये केवळ नालेसफाईसाठी दिले जातात. मग पाच वर्षात ५०० कोटी रुपये आणि ते सोडून छोटे नाले असो, स्ट्रोम वॉटर ड्रेन असो, त्याची दुरूस्ती असो व पाणी तुंबू नये म्हणून केलेली अन्य कामे असो यासाठीचे दरवर्षाला १०० कोटीप्रमाणे ५ वर्षाचे अधिकचे ५०० कोटी. याचा अर्थ संपूर्णपणे ५ वर्षात १ हजार कोटींचा खर्च. पण मुंबईकरांच्या नशिबी केवळ तुंबलेलं पाण घरात घुसण्याची स्थिती आहे. आजही स्ट्रोम वॉटर प्लांटमध्ये डेब्रिजच्या गोण्या पडल्यात. दुसऱ्याबाजूनला मलईच्या गोण्या कंत्राटदाराकडे हे विदारक चित्र मुंबईकरांसमोर आलं आहे", असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.