मुंबई - सलग चौथ्या दिवशी मुसळधार पावसानं मुंबईला झोडपून काढले आहे. जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. यामुळे रस्ते, रेल्वे वाहतुकीवर प्रचंड परिणाम झाला आहे. तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक सेवा उशिरानं सुरू आहे. दरम्यान, हार्बर रेल्वे मार्गावरील मानखुर्द रेल्वे स्टेशनच्या रुळावर पावसाचं पाणी साचलं आहे. यामुळे हार्बर रेल्वे मार्गावरील सेवा विस्कळीत झाली आहे. वाशी ते सीएसएमटी रेल्वे सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
दुसरीकडे, मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई अप-डाऊन मार्गावरील अनेक एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला आहे.
( खड्ड्यांपासून जिवाला धोका; त्याला हवंय पोलीस संरक्षण ! )
नालासोपाऱ्यातही रेल्वे रुळांवर पाणीदरम्यान, पावसाचा जोर आज सकाळीदेखील कायम असल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. नालासोपाऱ्यात रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं वसई ते विरार दरम्यानची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. विरारहून सुटणाऱ्या रेल्वे गाड्यांनादेखील पावसाचा फटका बसला आहे.त्यामुळे फलाटांवर मोठी गर्दी झाली आहे.
( Mumbai Rains : मुंबईत 150 अतिरिक्त पाणी उपसा पंप बसवलेत - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस )
दरम्यान, मुंबईतील मुख्याध्यापकांनी पावसाची परिस्थिती पाहून सुट्टी द्यावी, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले आहे. तर ठाणे आणि पालघरमधील सर्व शाळांना सुट्टी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर दुसरीकडे मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने मुंबईतील डबेवाला संघटनेने आज डबे पोहोचवण्याची सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे