Mumbai Rains: मुंबईत पाणी तुंबणार नाही, असा दावा केलाच नव्हता; महापौर किशोरी पेडणेकरांचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 01:12 PM2021-06-09T13:12:41+5:302021-06-09T13:13:00+5:30
मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा कधी केलाच नव्हता, असं स्पष्टीकरण मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात पहिल्याच पावसात त्रेधातिरपीट उडालेली पाहायला मिळत आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. तर रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं मध्य आणि हार्बर रेल्वे पूर्णपणे ठप्प झाली आहे. यात मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा कधी केलाच नव्हता, असं स्पष्टीकरण मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. त्यांनी आज मुंबईत आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट देऊन मुंबईतील एकूण पाऊस व सद्यस्थिती जाणून घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेनं केलेले सर्व दावे पहिल्याच पावसात फोल ठरले असून मुंबई शिवसेनेनं तुंबवून दाखवली, असल्याची टीका केली. त्यावर प्रत्युत्तर देताना किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत अजिबात पाणी तुंबणार नाही, असा दावा कधीच केला नव्हता, असं म्हटलं आहे. "मुंबईची भौगोलिक रचना सर्वांना माहित आहे. अनेक नाले हे समुद्राच्या खाली आहेत. त्यामुळे मुंबईत अजिबात पाणी तुंबणार नाही असा दावा कधीच केला नव्हता. पण पाणी भरलं तरी ते चार ते पाच तासांपेक्षा जास्त काळ तुंबून राहणार नाही. हायटाइड गेली तर अवघ्या चार तासांमध्ये साचलेल्या पाण्याचा निचरा होईल", असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
निंदकाचे घर असावे शेजारी
भाजप नेत्यांकडून मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावरुन शिवसेनेवर टीका केली जात आहे. यावर किशोरी पेडणेकर यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर देत बसण्यापेक्षा कामावर अधिक लक्ष देणं चांगलं आहे, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. "मुंबई महापालिकेनं कोरोनाच्या संकटात केलेलं काम संपूर्ण जगानं पाहिलं आहे. त्यामुळे टीका करणाऱ्यांना जास्त महत्व देण्याची गरज नाही. निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हटलं जातं. आम्ही फक्त कामावर लक्ष देतो. कोरोनामुळे वर्षभर कामगार उपलब्ध करणं देखील कठीण होतं. त्यातही पालिकेनं दिवसरात्र एक करुन काम केलं आहे", असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
ट्विटर आता डस्टबिन झालंय
भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करुन मुंबई मनपाच्या कारभारावरुन शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. "डेब्रीजच्या गोण्या जशाच्या-तशा नाल्यात. पावसाचे पाणी मुंबईकरांच्या घरात आणि मलाईच्या गोण्या मात्र कंत्राटदारांच्या खिशात!", असं ट्विट आशिष शेलार यांनी केलं आहे. याबाबत किशोरी पेडणेकर यांना विचारण्यात आलं असता त्यांनी "ट्विटर हे स्टँडर्ड गोष्टी आणि विचारांसाठी ओळखलं जातं. पण काही लोकांनी त्याचं आता डस्टबिन करुन टाकलंय. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून वाटेल ते बोललं जातं. त्यांच्या विधानाला फारसं महत्व देण्याची गरज वाटत नाही", असं महापौर म्हणाल्या.