Mumbai Rains: मुंबईत पाणी तुंबणारच! महापालिका आयुक्त चहल यांनी नेमकं कारण सांगितलं...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 02:44 PM2021-06-09T14:44:19+5:302021-06-09T14:45:59+5:30
Mumbai Rains Updates: पहिल्याच पावसात मुंबई व उपनगरांत पाणी तुंबल्यानं विरोधकांनी मुंबई महापालिका प्रशासनाला धारेवर धरलं आहे.
Mumbai Rains Updates: पहिल्याच पावसात मुंबई व उपनगरांत पाणी तुंबल्यानं विरोधकांनी मुंबई महापालिका प्रशासनाला धारेवर धरलं आहे. भाजपनं तर नालेसफाईचा दावा फोल ठरला असून यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही आपत्कालीन विभागाची पाहणी केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना मुंबईत पाणी तुंबणार नाही, असा दावा केलाच नव्हता असं विधान केलं. त्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी मुंबईतील हिंदमाता या पाणी साचलेल्या परिसरात पाहणी केली. मुंबईत पाणी का तुंबलं? यावर बोलताना चहल यांनी यामागची कारणं स्पष्ट केली आहेत.
"मुंबईत आतापर्यंत १४० ते १६० मिमी पाऊस झाला आहे. तसेच अवघ्या तासाभरात ६० मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे मुंबई तुंबलं आहे. आपल्याकडे ड्रेनेजची कॅरिंग कॅपॅसिटी कमी असल्यानं काही तासांसाठी मुंबईत पाणी तुंबणारच", असं चहल यावेळी म्हणाले.
मुंबईत पाणी तुंबल्यानंतर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी रस्त्यावर उतरून परिस्थितीची पाहणी केली. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर देखील उपस्थित होत्या. "साधारणपणे २४ तासांत १६५ मिमी पाऊस झाला तर अतिवृष्टी होते असं मानतो. परंतु, मुंबईत आतापर्यंत १४० ते १६० मिमी पाऊस झाला आहे. तसेच अवघ्या तासाभरात ६० मिमी पाऊस झाला आहे. एकट्या सायन-दादर परिसरात १५५ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे मुंबईत पाणी तुंबलं आहे", असं इक्बाल सिंह चहल यांनी सांगितलं.
मुंबईत पाणी तुंबणार नाही, असा दावा केलाच नाही
मुंबईत १०७ टक्के आणि १०४ टक्के नालेसफाईचे दावे पहिल्याच पावसाच फोल ठरले असल्याचा आरोप भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केला. तर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही मुंबईत पाणी तुंबणार नसल्याच्या शिवसेनेच्या दावा सपशेल खोटा ठरल्याचं नमूद केलं. त्यावर प्रत्युत्तर देताना महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा कधीच केला नाही आणि करणार देखील नाही, असं म्हटलं आहे. मुंबईतील नाले ते समुद्राच्या तळाशी आहेत. त्यामुळे मुंबईत पाणी तुंबणार नाही असं कुणीच दावा करू शकत नाही. पण साचलेल्या पाण्याचा चार ते पाच तासांत निचरा होईल अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.