Mumbai Rains Update, Red Alert: मुंबई आणि उपनगरांत पावसाने मंगळवारी दिवसभर थैमान घातले. रात्रभर कोसळणाऱ्या पावसाने बुधवारी सकाळी काही काळ विश्रांती घेतली होती, पण त्यानंतर पुन्हा एकदा पावसाने जोर धरला. पावसाच्या तडाख्यामुळे मुंबईसह उपनगरांतील सखल भागांमध्ये पाणी साचले होते. तशीच परिस्थिती आज ओढवू नये म्हणून महापालिकेने प्रत्येक वॉर्डमध्ये विशेष खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग येथे दिवसभर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे काही भागांना रेड अलर्ट तर काही भागांमध्ये ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे.
मुंबई आणि परिसरात काल रात्रीपासून आज सकाळपर्यंत मुसळधार पाऊस सुरु होता. सकाळी काही काळ पाऊस थांबला पण नंतर पुन्हा पावसाची बॅटिंग सुरू झाली. मुंबईत अनेक तासांपासून सुरू असलेल्या पावसाचा अद्याप तरी मुंबई लोकल ट्रेन सेवेला फटका बसलेला नाही. लोकल सेवा सुरू आहेत. सध्या पाऊस नसलेल्या ठिकाणी सध्या ढगाळ वातावरण असून जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईत पुढील ४ दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ७ आणि ८ जुलैला मुंबईत हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांमध्ये ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड या ठिकाणीदेखील पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, नाशिक, पुणे, ठाणे या जिल्ह्यांना हवामान खात्याच्या वतीनं ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आज दिवसभरातली परिस्थिती पाहता नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. कोकणात आणि कोल्हापूरात NDRF च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहे. पूरपरिस्थिती ओढवली तर मदतकार्याला उशीर होऊ नये यासाठी हा खबरदारीचा उपाय करण्यात आला आहे.