Join us

मध्य रेल्वे फक्त डोंबिवलीपर्यंत सुरु; स्थानकांवर तुडुंब गर्दी, चाकरमान्यांची वाहतूक कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 4:21 PM

मुंबई शहर आणि उपनगरांत मुसळधार पावसामुळे चाकरमान्यांची लाइफ लाइन असलेली लोकल सेवा विस्कळीत झाली आहे.

मुंबई

मुंबई शहर आणि उपनगरांत मुसळधार पावसामुळे चाकरमान्यांची लाइफ लाइन असलेली लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. पावसाचा सर्वाधिक फटका मध्य रेल्वेला बसला आहे. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक डोंबिवली ते कसारा/कर्जतपर्यंत पूर्णपणे ठप्प झाली आहे. सध्या सीएसएमटी ते डोंबिवली अशी लोकल सेवा सुरू आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. 

मध्य रेल्वेची लोकल सेवा फक्त डोंबिवलीपर्यंत सुरू असल्याची घोषणा भायखळा रेल्वे स्थानकात केली जात आहे. पावसाच्या दमदार हजेरीमुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम झाला आहे. कोल्हापूर-सीएसएमटी गाडी पुण्यात थांबवण्यात आली आहे. तसंच पुणे-सीएसएमटी इंटरसिटी एक्स्प्रेस, पुणे-सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस, पुणे-सीएसएमटी इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. यासोबतच सीएसएमटीहून पुण्याकडे जाणारी सिंहगड एक्स्प्रेस देखील रद्द करण्यात आली आहे. 

मुसळधार पावसाचा अंदाज घेता उद्या पुणे-सीएसएमटी एक्स्प्रेस आणि सीएसएमटी-पुणे सिंहगड एक्स्प्रेस रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय सीएसएमटी-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस, सीएसएमटी-पुणे डेक्कन एक्स्प्रेस आणि सीएसएमटी-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस या गाड्याही उद्या धावणार नाहीत, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. 

टॅग्स :मुंबई मान्सून अपडेटमुंबई