Mumbai rains updates: मुंबईत जोरदार पाऊस! हार्बर,मध्य रेल्वेचा वेग मंदावला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2018 06:33 AM2018-07-05T06:33:07+5:302018-07-05T09:03:48+5:30
गेल्या दोन दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरांत ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. तर नवी मुंबई, ठाणे परिसरात सुद्धा काही पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे.
मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरांत ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. तर नवी मुंबई, ठाणे परिसरात सुद्धा काही पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. या पावसामुळे मुंबईकरांची त्रेधा उडाली असून शहरातील काही सखल भागात पाणी साचले आहे. तसेच, पावसामुळे रस्त्यांवरील वाहतूक मंदावली आहे. तर लोकल सेवेवर काहीसा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. लोकल गाड्या काहीशा उशिराने धावत आहेत.
LIVE UPDATES :
- मुंबईत आठवडाभर मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज, मुंबईकरांना सावधानतेचा इशारा
- हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने
- मध्य रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटं उशिराने
- मुंबई उपनगरात जोरदार पावसाची हजेरी
दक्षिण मुंबईत कुलाबा, फोर्ट, नरिमन पॉइंट, भायखळा, लालबाग, गिरगाव, महालक्ष्मी, वरळी आणि दादर परिसरात वा-याच्या वेगाने बरसणा-या सरींमुळे मुंबईकरांचा वेग मंदावला. माटुंगा, सायनसह पूर्व उपनगरातील कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि पवई परिसरातही पावसाचा जोर कायम आहे. पश्चिम उपनगरात बोरीवली, कांदिवली, अंधेरी, विलेपार्ले आणि वांद्रे येथेही संततधार सुरूच आहे.
दरम्यान, भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ६ जुलै रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.