मुंबई : नेमेची मग येतो पावसाळा... या उक्तीप्रमाणे गोरेगाव पश्चिम मोतीलाल नगर क्रमांक 1 येथील नागरिकांच्या घरात कालपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पाणी शिरले आहे. मध्यरात्री दोन वाजता येथील घरांमध्ये शिरलेले पाणी सकाळी सहाच्या सुमारास काही प्रमाणात ओसारले अशी माहिती येथील उदय सोसायटीत राहणारे नागरिक समीर राजपूरकर यांनी दिली.
सुमारे 2600 बैठी घरे असलेला सदर परिसर हा सखल भागात असल्याने एक तास जरी पाऊस पडला तरी येथील घरात सुमारे दोन ते तीन फूट पाणी शिरते आणि अनेक कुटुंबीयांचे संसार पाण्याखाली तरंगतात. गेल्या 15 वर्षात येथील अनेक नागरिक आपली घरे विकून दुसरीकडे राहायला गेली. मात्र, पालिका प्रशासन यावर कायमस्वरूपी तोडगा काढत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) येत्या २४ तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबई शहर आणि उपनगर तसेच ठाणे व रायगड या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यासाठी ऑरेंज अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानुसार पालघरमधील काही भागांत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.