Join us

आजही मुसळधार, मुंबईकरांनी सावधगिरी बाळगावी, हवामान विभागाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2019 11:33 AM

पुढील तीन दिवस कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मुंबई : मुंबईत आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. पुढील २४ तासांत २०० मिमीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईकरांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन केले आहे. तसेच पुढील तीन दिवस कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मुंबई शहर आणि उपनगरला सोमवारी जोरदार पावसाने झोडपल्याने जनजीवन विस्कळीत झाले. काल नवी मुंबईतील खारघर परिसरातील कोपरा नाला फुटल्याने पांडवकडा धबधब्याचे पाणी थेट सायन-पनवेल महामार्गावर आल्याने वाहतूक काही काळ ठप्प होती. गोल्फ कोर्स, टाटा रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने उपचारासाठी आलेल्या रुग्णांचे हाल झाले. तुर्भे एमआयडीसी परिसरातील बोनसई गावात पूरस्थिती निर्माण झाली होती. गोवंडी येथे बांधकामाचा भाग कोसळून ११ जण जखमी झाले.

सोमवारी सकाळी ८.३० ते ११.३० या तीन तासांत मुंबईत तब्बल १०८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पनवेलमधील गाढी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने उमरोली गावाचा संपर्क तुटला. गावात जाणारी वाहतूक व्यवस्था कोलमडल्याने नागरिकांचे हाल झाले. पनवेल शहराला पाणीपुरवठा करणारे देहरंग धरण ओव्हरफ्लो झाले आहे. उरण शहर व गावांना पाणीपुरवठा करणारे रानसई धरणही दुथडी भरून वाहू लागले आहे, तर नवी मुंबई महापालिकेच्या मालकीच्या मोरबे धरणातील जलसाठाही वाढला आहे.

खंडाळा घाटात पुन्हा दरड कोसळलीमुंबई-पुणे लोहमार्गावर खंडाळा घाटातील मंकी हिल या ठिकाणी सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास मोठी दरड पडल्याने पुण्याकडे येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या थांबविल्या आहेत. मार्गावर आलेले दगड मोठे असल्याने ते ब्लास्ट करून फोडण्यात आले. रात्री उशिरा येथील वाहतूक सुरू झाली.

 

टॅग्स :मुंबई मान्सून अपडेटपाऊसमुंबई