संतोष आंधळेमुंबई : दरवर्षी येणारा हा पावसाळा विविध आजार तर घेऊन येतोच त्याशिवाय या काळात रस्त्यांवरून वाहतूक करणाऱ्याची मोठी परीक्षा घेत असतो. पावसाळ्यात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात त्यामुळे अशा रस्त्यावरून प्रवास करताना कधी अपघात होईल, हे काही सांगता येत नाही. या खड्ड्यांच्या ‘सीझन’मध्ये मान, पाठ आणि कंबर सांभाळायलाच हवी. एकीकडे खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले असताना दुसरीकडे अस्थिव्यंग शल्यचिकित्सकांकडे (ऑर्थोपेडिक सर्जन) या खड्ड्यांमुळे निर्माण झालेल्या व्याधींच्या उपचारकरिता गर्दी होत असते.
विशेषकरून मान, पाठ आणि कंबरदुखीच्या तक्रारींमध्ये भयंकर वाढ होत असते. काहीवेळा लोकांच्या पाठीचे दुखणे एवढे वाढते की, काहींना उठतासुद्धा येत नाही. त्यामुळे नागरिकांनी या काळात सावधगिरी बाळगून रस्त्यावर गाडी चालवली पाहिजे. दुचाकीस्वारानी तर खूपच काळजी घेण्याची गरज असल्याचे मत आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
ठाणे येथील घोडबंदर रोडवर या खड्ड्यांमुळेच एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या अशा दुर्घटना संपूर्ण राज्यात विविध ठिकाणी घडत असतात. मात्र या गोष्टीकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नाही. राज्य शासन, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद दरवर्षी कोट्यवधींचा निधी हा रस्त्यांच्या डागडुजीकरिता खर्च करीत असतात तरीही रस्त्यांवर खड्डे पडतात. हे गंभीर असल्याच्या प्रतिक्रीया नागरिकांच्या आहेत.
२०१८ मध्ये न्यायालय म्हणाले...सन २०१८ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने खड्डे व रस्तेदुरुस्तीबाबत स्वयंप्रेरणेने याचिका दाखल करून घेत राज्यातील सर्व महापालिकांना, नगर परिषदांना शहरांतर्गत व गावअंतर्गत असलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे व खड्डे बुजविण्याचे आदेश दिले होते.
२०२१ मध्ये न्यायालयाकडून कानउघडणीन्यायालयाने सर्व महापालिका व नगर परिषदांना किती खड्डे बुजविले, किती तक्रारी आल्या, किती तक्रारींचे निवारण केले, इत्यादींसंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश देत कानउघडणी केली होती. २७ महापालिकांपैकी केवळ सात महापालिकांनी अहवाल सादर केल्याचे न्यायालयाने गुरुवारी म्हटले.
खड्ड्यांच्या हिसक्यामुळे काही दुखणीया काळात खड्ड्यांच्या हिसक्यामुळे जी काही दुखणी निर्माण होतात, ती कमी करण्यासाठी काही थेट शस्त्रक्रिया लागत नाही. त्यामुळे बहुतांश नागरिक ज्यांना पाठीच्या आणि कमरेच्या व्याधी जाणवतात, ते आमच्याकडे येत असतात. काही रुग्णांना ट्रॅक्शन दिले जातात, तर काहींचे स्नायू बळकट होण्यासाठी व्यायाम दिला जातो. या उपचारानंतर रुग्णांना बऱ्यापैकी आराम मिळतो. डॉ. सुदीप काळे, अध्यक्ष, महाराष्ट्र फिजिओथेरपी कौन्सिल
बेल्टचा वापर करा...अगोदरपासून कंबरदुखीचा त्रास असेल तर त्यांनी या काळात प्रवास करताना बेल्टचा वापर करावा. अनेक वेळा एक खड्डा चुकविताना दुसऱ्या खड्ड्यात गाडी जाते आणि त्या झटक्याने शरीराच्या विविध भागांवर परिणाम होतो. त्याच्यामध्ये पाठ, मान आणि कमरेचा समावेश आहे. विशेष म्हणजे या खड्ड्यांच्या त्रासांमुळे कधी-कधी इतका झटका बसतो की काही नागरिकांना ‘ स्लिप डिस्कचा’ त्रास उद्भवतो. प्रवास करणे किंवा खड्डे तर टाळू शकत नाही त्यामुळे जितकी काळजी घेता येईल तितकी घेणे गरजेचे आहे. त्याशिवाय जर तुम्ही पाठीचा रोज व्यायाम करत असाल तर तुमचे स्नायू बळकट होतात. त्यामुळे ह्या खड्ड्यांच्या झटक्यांमुळे होणाऱ्या वेदना कमी होऊ शकतात.- डॉ. एकनाथ पवार, विभागप्रमुख, अस्थिव्यंग शल्यचिकित्सक सर जे. जे. रुग्णालय