लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सत्तरच्या दशकात वेग आणि आलिशान प्रवासाचे प्रतीक असलेली, भारतीय रेल्वे सेवेत एकप्रकारे क्रांती आणणारी मुंबई -नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेस आज, मंगळवारी ५० व्या वर्षात पदार्पण करत आहे. देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईला जोडणाऱ्या या रेल्वेतून प्रवास करण्याचे आजही अनेकांचे स्वप्न असते.
विशेष म्हणजे वेळेवर धावणारी व पूर्ण वातानुकूलित असलेल्या या रेल्वेचे ग्लॅमर तसूभरही कमी झालेले नाही, त्यामुळेच सुखनैव प्रवासाची अनुभूती देणाऱ्या या रेल्वेने प्रवास करणे आजही लोकांना प्रतिष्ठेचे वाटते. भारतीय रेल्वेने १६९ वर्षांच्या इतिहासात अनेक मैलाचे दगड गाठले आहेत. वाफेच्या इंजिनपासून आताच्या बुलेट ट्रेनने प्रवास करण्याची तयारी सुरू आहे. मंगळवारी भारतीय रेल्वेच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला जाणार आहे. १७ मे १९७२ रोजी रेल्वेने तत्कालीन बॉम्बे सेंट्रलवरून देशाच्या राजधानीसाठीचा या रेल्वेने प्रवास सुरू झाला.
देशातील पहिली पूर्ण वातानुकूलित गाडी दिल्ली आणि हावडा (कोलकाता) दरम्यान चालविण्यात आली. त्याच्या बरोबर तीन वर्षांनंतर ही सेवा सुरू झाली. त्यापूर्वी मुंबई ते दिल्लीसाठी फ्रंटियर मेल आणि पश्चिम एक्स्प्रेससारख्या गाड्या होत्या.
१६०किमी प्रतितास गतीने धावणार
१९८८ पर्यंत १२० किमी प्रतितास या गतीने चालणारी राजधानी एक्स्प्रेस सर्वांत जलद गाडी होती. आता आधुनिक स्वरूपातील वंदे भारत आणि काही शताब्दी गाड्या जलदगतीने धावत आहेत. येत्या चार वर्षांत रेल्वे रुळ अद्ययावत केल्यानंतर राजधानी एक्स्प्रेस प्रतितास १६० किमीच्या गतीने धावेल. त्यामुळे मुंबई ते दिल्ली अंतर १२ तासांत कापता येईल, असे एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले.
प्रवासही वेगवान
राजधानी एक्स्प्रेसने भारतीय रेल्वे रुळावरील आपली पकड मजबूत करत गेल्या ५० वर्षांत इंजिन, डबे आणि सेवा सातत्याने अद्ययावत केल्या आहेत. मुंबई ते दिल्ली १९ तास आणि ५ मिनिटांचा प्रवासी वेळेत सुरू झालेला प्रवास आता १५ तास आणि ५० मिनिटांवर आला आहे. या वेळेत आणखी घट करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
राजधानी एक्स्प्रेसचा प्रवास
- १ मार्च १९६९ मध्ये पहिली राजधानी एक्स्प्रेस नवी दिल्ली हावडादरम्यान चालविण्यात आली
- १७ मे १९७२ मध्ये मुंबई-दिल्ली मार्गावर राजधानी एक्स्प्रेस सुरू
- २ ऑक्टोबर १९८१ मध्ये डब्यांची संख्या १८ पर्यंत वाढवली, दोन इंजिनांद्वारे गाडी चालविली
- २ ऑक्टोबर २००० पासून राजधानी एक्स्प्रेस दैनिक गाडी चालविण्यात आली
- १५ डिसेंबर २००३ रोजी राजधानी एक्स्प्रेसला एलएचबी डबे जोडण्यात आले
- १९ जुलै २०२१ मध्ये भारतीय रेल्वेत प्रथम तेजस प्रकारातील शयनयान डबे मुंबई-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेसला जोडले
- प्रवाशांची पसंती सद्य:स्थितीत राजधानी एक्स्प्रेस प्रवाशांमध्ये सर्वांत लोकप्रिय आहे. इतर प्रकारांतील गाड्यांपेक्षा राजधानी प्रकारातील गाड्यांना सर्वांत जास्त प्राधान्य दिले जाते. राजधानी एक्स्प्रेस चालविण्यासाठी उत्कृष्ट रेकॉर्ड असलेल्या वरिष्ठ लोको पायलटची निवड केली जाते.