लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नवी नवरी मांडवात जाताना जशी सजते, अगदी तशाच थाटात मंगळवारी राजधानी एक्स्प्रेसमुंबईहून दिल्लीच्या दिशेने रवाना झाली. निमित्त होते सुवर्ण महोत्सवी वर्षाचे. पश्चिम रेल्वेची शान या गाडीने १७ मे रोजी ५० व्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्त मुंबई सेन्ट्रल स्थानकात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
मुंबई सेंट्रल ते नवी दिल्ली मार्गावर धावणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसने वयाचे अर्धशतक पूर्ण केल्याबद्दल तिचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या गाडीचे सारस्थ केलेल्या लोकोपायलट आणि काही आजी-माजी कर्मचाऱ्यांनी यावेळी आठवणींना उजाळा दिला. राजधानी एक्स्प्रेसचा वाढदिवस साजरा करण्यात आला. मुंबई सेंट्रल येथे आयोजित कार्यक्रमात रोटरी क्लबच्या मुलांनी भारतीय रेल्वेवर आधारित नृत्य सादर केले. यावेळी पश्चिम रेल्वेचे मुख्य वाणिज्य प्रबंधक अशोक कुमार मेहता, महाराष्ट्र पोस्ट सर्कलच्या चीफ पोस्ट मास्तर जनरल वीणा श्रीनिवासन, डीआरएम जे. व्ही. एल. सत्यकुमार उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र पोस्ट सर्कलने विशेष तिकीट प्रसिद्ध करून राजधानीच्या प्रवासाचा आनंद द्विगुणित केला.
चिरतरुण आजोबांनी वेधले लक्ष
१७ मे १९७२ रोजी मुंबई ते नवी दिल्ली मार्गावर पहिली राजधानी धावली. या गाडीने प्रवास करणाऱ्या कमरुज जमान यांनी मंगळवारी सर्वांचेच लक्ष वेधले. ९० वर्षीय जमान यांनी ५० व्या वर्षात पदार्पण केलेल्या राजधानीने प्रवास करण्याची संधी सोडली नाही. वरिष्ठ प्रवासी प्रतिनिधी म्हणून पश्चिम रेल्वेतर्फे त्यांचा विशेष तिकीट देऊन सत्कार करण्यात आला.
राजधानीला जोडणार वंदे भारतचे कोच
- मुंबई ते दिल्ली हा १९ तास ५ मिनिटांचा प्रवास आता १५ तास ३२ मिनिटांवर आला आहे.
- १९८८ पर्यंत १२० किमी प्रतितास वेगाने धावणारी राजधानी एक्स्प्रेस सर्वांत जलद गाडी होती.
- येत्या चार वर्षांत रेल्वे रुळ अद्ययावत केल्यानंतर राजधानी एक्स्प्रेस प्रतितास १६० किमीच्या गतीने धावणार आहे. त्यामुळे मुंबई ते दिल्ली अंतर १२ तासांत कापता येणार आहे.
- तसेच येत्या काळात राजधानीला वंदे भारत ट्रेनचे कोच जोडले जाणार आहेत.
- एका फेरीतील प्रवासी - १,१००
- मुंबई सेंट्रल ते दिल्ली वेळ - १५ तास ३२ मिनिटे
- वर्षाकाठी एका फेरीमागे उत्पन्न - सरासरी ११० कोटी