जगात रिअल इस्टेटमध्ये मुंबई १९ व्या क्रमांकावर; ९५ व्या स्थानावरून घेतली मोठी झेप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 06:40 AM2023-10-15T06:40:33+5:302023-10-15T06:40:58+5:30
बांधकाम क्षेत्रातील जागतिक स्तरावरील घडामोडींचा आढावा घेणारा एक अहवाल नाईट फ्रँक या अग्रगण्य कंपनीने तयार केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेले आणि देशातील सर्वात महाग रिअल इस्टेट मार्केट अशी ओळख असलेले मुंबई शहर आता जगाच्या नकाशावरही महागडे शहर म्हणून उदयास आले आहे. नुकत्याच संपलेल्या तिमाहीत, बांधकाम क्षेत्राच्या जागतिक क्रमवारीत मुंबईने १९ क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच कालावधीत जागतिक क्रमवारीत मुंबई शहर ९५ व्या स्थानावर होते. जगातील तब्बल ७६ शहरांना मागे टाकत मुंबई १९ व्या क्रमांकावर धडकली आहे. या क्रमवारीत बंगळुरू शहर २२ क्रमांकावर तर, नवी दिल्ली २५ व्या क्रमांकावर आहे.
बांधकाम क्षेत्रातील जागतिक स्तरावरील घडामोडींचा आढावा घेणारा एक अहवाल नाईट फ्रँक या अग्रगण्य कंपनीने तयार केला आहे. यानुसार, मुंबईतील रिअल इस्टटेच्या किमती सातत्याने वाढत असून वर्षाकाठी सरासरी ६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या तीन महिन्यांत मुंबई शहर व उपनगरात महिन्याकाठी सातत्याने १० हजारांपेक्षा जास्त मालमत्तांचे व्यवहार झाले आहेत. तर नव्या प्रकल्पांची उभारणीदेखील तेजीत आहे.
गेल्या पाच वर्षांपासून मुंबईत आलिशान मालमत्तांची उभारणीही मोठ्या प्रमाणावर होत आहे. ज्या मालमत्तांची किंमत १० कोटी किंवा त्यापेक्षा अधिक आहे अशा मालमत्तांचे मुंबईच्या एकूण मालमत्ता विक्रीमधील प्रमाण लक्षणीय आहे. तर, एक बेडरूम किचन हा प्रकार मुंबईतून हळूहळू कमी होत असून किमान दोन बेडरूम किचन किंवा त्यापेक्षा अधिक जागेचे घर घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढताना दिसत आहे.
युरोप, अमेरिकेत मालमत्ता दरात घसरण
एकिकडे मुंबई व देशातील अन्य प्रमुख शहरांच्या किमतीमध्ये सातत्यपूर्ण वाढ नोंदली जात असली तरी, युरोप, अमेरिका, दक्षिण आफ्रिका अशा प्रमुख खंडातील सुमारे १०७ शहरांतील मालमत्तांच्या दरात घसरण नोंदवली आहे. गेल्या काही वर्षांत किमान दीड ते कमाल पाच टक्क्यांनी घसरण झाली आहे.