महागड्या घरांच्या यादीत जगात मुंबई आठव्या क्रमांकावर, नाईट फ्रँकचा अहवाल
By मनोज गडनीस | Published: February 28, 2024 06:12 PM2024-02-28T18:12:35+5:302024-02-28T18:12:48+5:30
२०२३ च्या वर्षामध्ये मुंबईसह महामुंबईत परिसरात एकूण दीड लाखांपेक्षा जास्त घरांची विक्री झाली.
मुंबई - आलिशान घरांच्या किमतीच्या क्रमवारीत मुंबई शहराने जगात आठव्या क्रमांकाचे स्थान गाठले आहे. २०२३ मध्ये जगातील प्रमुख शहरात झालेल्या गृहनिर्माण क्षेत्रातील घडामोडींचा वेध घेत बांधकाम क्षेत्रासंदर्भात सर्वेक्षण करणाऱ्या नाईट फ्रँक कंपनीने या संदर्भात एक अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. त्याद्वारे ही माहिती पुढे आली आहे.
विशेष म्हणजे २०२२ मध्ये आलिशान घरांच्या जागतिक क्रमवारीत मुंबई शहराचा क्रमांक ३७ वा होता. तेथून झेप घेत मुंबई शहराने आता आठवा क्रमांक गाठला आहे. तसेच, गेल्या काही वर्षांत मुंबई शहरांतील घरांच्या किमतीमध्ये वर्षाकाठी सरासरी १० टक्क्यांची भाववाढ नोंदली गेली आहे. प्राप्त माहितीनुसार, मुंबईत सध्या किमान ११०८ चौरस फूटांचे आलीशान घर विकत घ्यायचे असेल तर त्याकरिता किमान ८ कोटी २४ लाख रुपये मोजावे लागतात.
एवढ्याच पैशांत जर दिल्लीत घर घ्यायचे असेल तर दिल्लीत किमान २३३५ चौरस फूटांचे आलिशान घर प्राप्त होऊ शकते. २०२३ च्या वर्षामध्ये मुंबईसह महामुंबईत परिसरात एकूण दीड लाखांपेक्षा जास्त घरांची विक्री झाली. या जागतिक क्रमवारीत एकिकडे मुंबईने पहिल्या दहात क्रमांक पटकावला आहे तर, दिल्लीने आता ३७ वा क्रमांक गाठला आहे. २०२२ च्या वर्षात दिल्ली ७७ व्या क्रमांकावर होती.