लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत रविवारी दिवसभरात ३६२ रुग्णांची नोंद झाली, तर १० जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या ५ हजार ६१० सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत पुन्हा एकदा रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. दिवसभरात ५३९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७ लाख १० हजार ३४८वर पोहोचली आहे.
शहर उपनगरात रुग्ण दुपटीचा कालावधी वाढत असून, १,२९९ दिवसांवर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे. १८ ते २४ जुलैदरम्यान मुंबईतील कोविडवाढीचा दर ०.०५ टक्के आहे.
शहर उपनगरात कोरोनाग्रस्तांचा आकडा ७ लाख ३२ हजार ७४१वर पोहोचला आहे, मृतांचा एकूण आकडा १५ हजार ७४९वर गेला आहे. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी ३१ हजार ६०१, तर आतापर्यंत एकूण ७९ लाख ६५ हजार ३३० चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या ३ चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत, तर ६१ इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. मागील २४ तासांत पालिकेने रुग्णांच्या संपर्कातील २ हजार ९९६ अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेतला आहे
५५० रुग्ण गंभीर अवस्थेत
मुंबईतील सक्रिय रुग्णांपैकी ५५० रुग्ण गंभीर अवस्थेत असून, त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. २ हजार ५६९ लक्षणविरहीत रुग्ण असून, २ हजार ६८० रुग्णांमध्ये सौम्य व मध्यम लक्षणे आहेत.