Join us

मुंबई : रॉकेलच्या नावावर ‘थीनर’चा बाजार, ग्राहकांची केली जातेय दिशाभूल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2022 8:56 AM

मुंबई २०१६ पासून रॉकेलमुक्त करण्यात आली असली, तरी आजही कित्येक रेशन दुकानांत सर्रास रॉकेलची विक्री होताना दिसते.

सुहास शेलारमुंबई : मुंबई २०१६ पासून रॉकेलमुक्त करण्यात आली असली, तरी आजही कित्येक रेशन दुकानांत सर्रास रॉकेलची विक्री होताना दिसते. परंतु हे रॉकेल नसून, ‘थीनर’सदृश्य द्रवपदार्थ असल्याची माहिती पुरवठा विभागातील सूत्रांनी दिली. सरकारकडून होणारा केरोसीनचा पुरवठा बंद झाल्यामुळे थीनर विकून ग्राहकांची दिशाभूल केली जात आहे.प्रामुख्याने गोवंडी, चेंबूर, मानखुर्द, मालाड, कांदिवली, धारावी आणि साकीनाक्यातील झोपडपट्ट्यांमधील काही रेशन दुकानांत थीनरची विक्री केली जात आहे. अस्थायी कामगार आणि मजूर वर्ग त्यांचे प्रमुख ग्राहक आहेत. रॉकेलच्या नावाखाली ७० ते ८० रुपयांना विकला जाणारा हा द्रवपदार्थ पांढरा आणि काहीसा पिवळसर रंगाचा असतो. दुकानदार थेट कंपनीच्या दलालांकडे ऑर्डर नोंदवितात. त्यानंतर, टेम्पोद्वारे ३५ लीटरच्या डब्ब्यांतून त्याचा पुरवठा केला जातो. एक दुकानदार महिन्याला सरासरी ३ हजार लीटर थीनर विकत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याची खात्री करण्यासाठी या प्रतिनिधीने पाहणी केली असता, गोवंडीच्या बेगनवाडी रोड क्रमांक १४ येथील रेशन दुकानात थीनरची विक्री केली जात असल्याचे आढळले. थीनरचा साठा ठेवलेल्या ठिकाणी कोणालाही जाऊ दिले जात नाही. नियमित ग्राहकांव्यतिरिक्त अन्य कोणी रॉकेल मागितल्यास प्रथम पडताळणी केली जाते. जोखीम वाटल्यास सरळ नकार कळविला जातो, असेही निदर्शनास आले.

मुंबई विभाग हा रॉकेलमुक्त करण्यात आला आहे. त्यामुळे रॉकेलच्या नावाखाली अन्य पदार्थच काय, रॉकेलही विकण्यास परवानगी नाही, असे काही होत असेल, तर तपासून पाहिले जाईल.विजय वाघमारे, सचिव, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग.

स्फोट होण्याची भीती

  • रॉकेल हे फिल्टर होऊन येत असल्याने, स्टोव्हमध्ये भरल्यानंतर त्याचा अपाय होत नाही. याउलट थीनर हे जडपातळ स्वरूपात असते. प्रामुख्याने रंगात मिसळण्यासाठी ते तयार केलेले असते. 
  • रॉकेल समजून स्टोव्हमध्ये भरल्यानंतर बर्नरमध्ये अडकून त्याचा स्फोट होऊ शकतो. झोपडपट्ट्यांत स्फोट झाल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. 
  • त्यामुळे सरकारने याकडे तातडीने लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी रेशन अभ्यासक शैलेश सोनावणे यांनी केली.
टॅग्स :मुंबई