मुंबई - राजधानी मुंबईच्या समुद्रात सुरू असेलली क्रूझवरील ड्रग्ज पार्टी एनसीबीनं (NCB) उधळून लावली होती. यात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (aryan khan arrested) याच्यासह एकूण ११ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. पण, या प्रकरणाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केलेल्या खळबळजनक दाव्यानंतर वेगळच वळण मिळालं आहे. आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांना एनसीबीच्या कार्यालयात घेऊन जाणारे भाजपाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. आता, मलिक यांनी यासंदर्भातील दोन व्हिडिओ शेअर केले आहेत.
क्रूझवर छापा टाकून एनसीबीनं आर्यन खानला अटक केली. यावेळी एका व्यक्तीनं त्याच्यासोबत फोटो काढला. त्या व्यक्तीचा आणि आर्यन खानचा एक सेल्फीदेखील व्हायरल झाला. मात्र, तो आमचा अधिकारी नव्हताच, असं एनसीबीनं नंतर सांगितलं. मग हा व्यक्ती कोण होता? तो आर्यन खानसोबत काय करत होता? एनसीबीनं याची उत्तरं द्यायला हवीत, असा प्रश्न मलिक यांनी केला आहे. तसेच, भाजपा पदाधिकारी क्रुझची घटना घडली त्याचदिवशी एनसीबीच्या कार्यालयात का गेला? असा प्रश्न मलिक यांनी विचारला आहे. तसेच, या घटनेचे दोन व्हिडिओही त्यांनी शेअर केले आहेत. त्यामध्ये, किरण गोसावी आणि मनिष भानुषाली हे एनसीबीच्या कार्यालयात जात-येत असताना दिसून येतात.
काय म्हणाले होते नवाब मलिक?
क्रूझ शिप ड्रग्ज पार्टीवरील कारवाईबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं संशय व्यक्त करत एनसीबीच्या संपूर्ण कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. एनसीबीच्या कारवाईवेळी भाजपचा पदाधिकारी काय करत होता? भाजप आणि एनसीबीचा नेमका संबंध काय? असे सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी उपस्थित केले. आर्यन खानसोबत अटक करण्यात आलेल्या अरबाज मर्चंटला एनसीबी कार्यालयात घेऊन जाणारा व्यक्ती भाजपचा पदाधिकारी असल्याचा दावा मलिक यांनी केला. त्यांनी या व्यक्तीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबतचे फोटोदेखील दाखवले.
आरोप बिनबुडाचे, तथ्य नाही - एनसीबी
एनसीबीच्या कारवाईत वैयक्तिकरित्या मदत केलेल्या साक्षीदारांचीही माहिती यावेळी देण्यात दिली. एनसीबीनं काही व्यक्तींची नावं जाहीर केली. मनीष भानुशाली आणि किरण गोसावी यांचीही नावं घेतली. "क्रूझवर टाकलेल्या छाप्यासाठी काही जणांनी आम्हाला माहिती देण्याचं काम केलं होतं. संपूर्ण कारवाई कायदेशीर पद्धतीनंच झालेली आहे. या प्रकरणात साक्षीदार म्हणूनही आम्हाला काही जणांनी मदत केली आहे. आमच्यावर करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे आहेत. त्यात कोणतंही तथ्य नाही", असं एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.