ताैक्ते चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी मुंबई सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:05 AM2021-05-17T04:05:17+5:302021-05-17T04:05:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ताैक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत ताशी सुमारे ६० ते ८० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता ...

Mumbai ready to face cyclone | ताैक्ते चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी मुंबई सज्ज

ताैक्ते चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी मुंबई सज्ज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ताैक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत ताशी सुमारे ६० ते ८० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून, सोबत जोरदार पाऊसही कोसळू शकतो. चक्रीवादळाचा मुंबई महानगराला थेट धोका नसला तरी मुंबई किनाऱ्याला लागून ते जात असल्याने, वादळी वारे व मुसळधार पावसाची शक्यता पाहता खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

ताैक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबई महापालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट देऊन चक्रीवादळाची सद्य:स्थिती व महापालिकेने केलेल्या पूर्वतयारी कामांचा आढावा घेतला. याप्रसंगी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख रश्मी लोखंडे उपस्थित होत्या. मुंबईकर नागरिकांनी महापालिका प्रशासनाने दिलेल्या सूचनाचे पालन करावे, असे आवाहन महापौरांनी यानिमित्ताने केले आहे.

ताैक्ते चक्रीवादळाच्या वाऱ्याचा वेग वाढून तो ताशी ६० किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. काही ठिकाणी हा वेग ताशी ८० किलोमीटरपर्यंत जाऊ शकेल. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल; काही ठिकाणी जोराचा पाऊस पडू शकतो, असाही अंदाज हवामान खात्याद्वारे वर्तविण्यात आला आहे. हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज लक्षात घेता पुढील दोन दिवस नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

--------------------

नागरिकांनी जाऊ नये : मुंबईतील चौपाट्या, तसेच समुद्रकिनाऱ्यानजीकचा परिसर आदी ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये. तसेच या अनुषंगाने मुंबई पोलीस व अग्निशमन दल यांनी आवश्यक ती कार्यवाही करावी.

रेल्वे सेवा सुरू राहणार : राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या तुकड्या आवश्यक त्या साधनसामग्रीसह सुसज्ज आहेत. रेल्वेच्या स्तरावर आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात आल्या असून, उपनगरीय रेल्वे सेवा ही पुढील दोन दिवस सुरू राहील, अशी माहिती रेल्वेद्वारे देण्यात आली.

तातडीने बॅरिकेड्स लावा : मुंबई मेट्रो, रस्ते विभाग, सागरी किनारा मार्ग (कोस्टल रोड) एमएमआरडीए आदींद्वारे ज्या ज्या ठिकाणी पायाभूत सोयी सुविधांविषयी कामे सुरू आहेत, अशा सर्व ठिकाणी सुयोग्य प्रकारे व तातडीने बॅरिकेड्स लावून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.

पाणी साचू नये : सखल भागात पाणी साचू नये, यासाठी आवश्यक त्या सर्व ठिकाणी उदंचन संच बसविण्यात आले असून, ते सुसज्ज व कार्यतत्पर असल्याची खात्री करण्यात आली आहे.

रिफ्लेक्टिव्ह जॅकेट : महापालिकेचे कर्तव्यावर उपस्थित असणारे कामगार कर्मचारी व अधिकारी यांनी रिफ्लेक्टिव्ह जॅकेट परिधान करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

वीज पुरवठा अखंडित राहणार : वीज वितरण करणाऱ्या कंपन्यांनी आवश्यक त्या मनुष्यबळासह, सामग्रीसह सुसज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. जेणेकरून कोणत्याही परिसरात विद्युत पुरवठा खंडित झाल्यास तो लवकरात लवकर पूर्ववत करता येऊ शकेल.

२४ विभागांना सज्जतेच्या सूचना : महापालिकेच्या सर्व २४ विभागांच्या आयुक्तांना आवश्यक त्या मनुष्यबळासह व साधनसामग्रीसह सुसज्ज व कार्यतत्पर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नागरिकांना हलविणार : समुद्रकिनाऱ्यालगत, सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना आवश्यकतेनुसार अन्यत्र हलविणे गरजेचे झाल्यास, त्या दृष्टीने तात्पुरते निवारे यापूर्वीच निश्चित करण्यात आले आहेत.

प्रतिसाद पथक : नौदल, तटरक्षक दल, थलसेना, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक यांची मदत आवश्यकतेनुसार उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टीने समन्वय साधण्याची कार्यवाहीदेखील आपत्कालीन व्यवस्थापन खात्याद्वारे करण्यात येत आहे.

पूर बचाव पथके : वेगाने वारे वाहण्याची शक्यता व पर्जन्यवृष्टीची संभाव्यता लक्षात घेऊन सहा चौपाट्यांवर पूर बचाव पथके तैनात करण्याचे निर्देश मुंबई अग्निशमन दलास देण्यात आले आहेत. तसेच या सर्व ठिकाणी मुंबई पोलिसांच्या मोबाईल व्हॅन्स कार्यतत्पर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

५१२ नौका सुखरूप : पालघर जिल्ह्यातील मच्छिमारीसाठी समुद्रात गेलेल्या ५१२ नौका समुद्रकिनारी सुखरूप पोहोचल्या आहेत. चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने अलर्ट जारी केला होता. नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

२५ बोटी आश्रयासाठी : रायगड जिल्ह्यातील मच्छिमारीसाठी समुद्रात गेलेल्या ९६ नौका समुद्रकिनारी सुखरूप पोहोचल्या आहेत. दिघी बंदर येथे मुंबई शहर व मुंबई उपनगर येथील २५ बोटी आश्रयासाठी आल्या आहेत, तर परप्रांतीय कोणतीही नौका रायगड जिल्ह्यात आश्रयाला आलेली नाही.

Web Title: Mumbai ready to face cyclone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.