कोरोना लढ्यासाठी मुंबई सज्ज; कृती आराखडा तयार, शासकीय व खासगी रुग्णालयांत जय्यत तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 05:22 AM2022-12-26T05:22:50+5:302022-12-26T05:23:22+5:30
पालिकेने कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी सुसज्ज रुग्णालये आणि जनरल बेड, ऑक्सिजन बेड, अतिदक्षता बेड उपलब्ध करून दिली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना महासाथीचा पहिल्या दोन लाटांचा दाहक अनुभव गाठीशी असल्याने या विषाणूच्या नव्या उत्परिवर्तित प्रकाराने पुन्हा शहरात शिरकाव केलाच तर त्याच्या नि:पातासाठी मुंबई महापालिका पूर्णपणे सज्ज झाली असून त्यानुसार कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
शहरातील सेव्हन हिल्स आणि कस्तुरबा ही दोन रुग्णालये पालिकेच्या अखत्यारित येतात तर कामा, सेंट जॉर्ज, टाटा आणि जगजीवन राम ही रुग्णालये शासकीय आहेत. तर ८७६ खाटांची क्षमता असलेली २६ रुग्णालये आहेत. या सर्व रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधितांवर उपचार करण्याची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय ऑक्सिजन आणि आयसीयू बेडही पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. या सर्व रुग्णालयातील रुग्णांच्या भरतीचे व्यवस्थापन वॉर रूमद्वारे केले जाणार असल्याचे महापालिका आरोग्य विभागाने कळवले आहे.
पालिकेने कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी सुसज्ज रुग्णालये आणि जनरल बेड, ऑक्सिजन बेड, अतिदक्षता बेड उपलब्ध करून दिली आहेत. या उपाययोजना कोरोनाचा प्रसार नियंत्रित करण्यात आणि जनतेचे आरोग्य राखण्यात महत्त्वपूर्ण ठरले आहे. महापालिकेच्या २४ वॉर्डांत वॉर्ड वॉर रूम २४ बाय सात कार्यरत आहेत, नागरिक कोणत्याही अडचणीच्यावेळी त्यांच्याशी संपर्क साधू शकतात. रुग्णांचे व्यवस्थापन करण्यासाठी लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, ड्युरा सिलेंडर्स आणि पीएसए टँकच्या स्वरूपात पुरेशी ऑक्सिजन सुविधा उपलब्ध असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
राज्यात ६ कोटींहून अधिक ‘लसवंचित’
मुंबईत लस साठ्याचा खडखडाट असल्याची बाब समोर आल्यानंतर आता राज्यातही कोविड प्रतिबंधक लसीचा साठा अत्यल्प प्रमाणात असल्याचे दिसून आले आहे. राज्यात १७ लाख लस साठा शिल्लक आहे. राज्यात सद्यस्थितीत ८० लाख ६० हजार ५४० नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे. तर दुसरीकडे अजूनही बूस्टर डोसपासून जवळपास सहा कोटी ५२ लाख ७४ हजारांहून अधिक लाभार्थी लसवंचित आहेत.
दिवसभरात ३२ रुग्णांची नोंद
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, राज्यात रविवारी ३२ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून दिवसभरात २० रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. दिवसभरात शून्य मृत्यूची नोंद आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"