महाअभिवादनासाठी मुंबई सज्ज !

By admin | Published: December 6, 2015 02:46 AM2015-12-06T02:46:55+5:302015-12-06T02:46:55+5:30

महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर दाखल झालेल्या लाखो अनुयायांकडून रविवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महाअभिवादन केले जाणार आहे. चैत्यभूमीकडे जाणारे

Mumbai is ready for a great tribute! | महाअभिवादनासाठी मुंबई सज्ज !

महाअभिवादनासाठी मुंबई सज्ज !

Next

मुंबई : महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर दाखल झालेल्या लाखो अनुयायांकडून रविवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महाअभिवादन केले जाणार आहे. चैत्यभूमीकडे जाणारे सर्व रस्ते अनुयायांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. चैत्यभूमीवर दाखल झालेल्या लाखो अनुयायांना सेवा-सुविधा पुरवण्यासाठी महापालिका, बेस्ट आणि विविध सेवाभावी संस्था सरसावल्या आहेत. अनुयायांना येथे आवश्यक सुविधा पुरविण्यात येत असून, चोख सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली आहे.
राज्यासह देशातून अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाले असून, शनिवारी मोठ्या संख्येने अनुयायी मुंबईत आले आहेत. कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागू नये म्हणून महापालिकेकडून येथे आपत्कालीन कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. महापालिकेचे २०० अधिकारी आणि ६ हजार कर्मचारी येथे कार्यरत आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अग्निशमन दलाद्वारे अग्निसुरक्षाविषयक बाबींची नियमितपणे तपासणी करण्यात आली आहे.
खाद्यपदार्थ विक्रीसाठीचे ८० स्टॉल्स मांडण्यात आले आहेत. १ हजार ५२० चौरस फूट इतक्या जागेवर माहिती कक्ष उभारण्यात आला आहे. शिवाजी पार्क परिसरात अतिदक्षता रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी २७० ठिकाणी नळांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मोबाइल चार्ज करता यावा यासाठी १०० ठिकाणी चार्जिंग पॉइंट देण्यात आले आहेत.
दादरच्या समुद्रकिनारी ४ बोटींसह जल सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. राजगृह येथेही नियंत्रण कक्ष आणि वैद्यकीय कक्ष उभारला आहे. बाहेरगावावरून येणाऱ्या अनुयायांसाठी कुर्ला टर्मिनस परिसरात नियंत्रण कक्ष, आरोग्य सेवा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

अनुयायांसाठी व्यवस्था
चैत्यभूमीवरील आदरांजलीचे चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क येथे पडद्यांवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
अनुयायांची गैरसोय होऊ नये म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात १ हजार ५०० चौरस मीटर क्षेत्रफळात तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
दादर पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ आणि दादर पूर्वेकडील स्वामीनारायण मंदिराजवळ नियंत्रण कक्ष/माहिती कक्ष, फिरती शौचालये, स्नानगृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि वैद्यकीय कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे.

बेस्टतर्फे सुविधा
बेस्टकडून चैत्यभूमी, शिवाजी पार्क, दादर चौपाटी, राजगृह, आंबेडकर महाविद्यालय येथे अतिरिक्त मार्गप्रकाश दिवे बसविले आहेत. शिवाय सर्च लाइट्स बसविल्या आहेत. तसेच विविध बसमार्गांवर अतिरिक्त बसगाड्या चालविण्यात येत आहेत.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस दलाचे १० साहाय्यक पोलीस आयुक्त, ४० पोलीस निरीक्षक, ८० पोलीस उपनिरीक्षक, १२०० पोलीस याबरोबरच ४ शीघ्र पोलीस कृती दल, ८ कॉम्बॅट व ८ राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

जादा गाड्या : २४१, ३५१, ३५४, १६ या बसमार्गांवर रात्री उशिरापर्यंत ८ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. ६ डिसेंबर रोजी पहाटे ६ वाजल्यापासून २७, ५३, ६३, १६५, २४१, ३०५, ३५४, ३५७, ३८५, ५२१ या बसमार्गांवर एकूण ३५ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.

मुंबई काँग्रेसतर्फे
वैद्यकीय मदत केंद्र
शिवाजी पार्क येथे मुंबई काँग्रेसतर्फे मोफत वैद्यकीय सहायता केंद्र चालविण्यात येणार आहे. या केंद्रामध्ये रुग्णांना मोफत औषध वाटप करण्यात येईल. २४ तास तेथे तज्ज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत राहणार आहे, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली.

महापालिकेचे आवाहन
अनुयायांनी आपल्या समवेत आणलेली लहान मुले व वृद्ध लोकांची विशेष काळजी घ्यावी आणि महापालिकेने केलेल्या रांगेतून अत्यंत शिस्तबद्धरीत्या दर्शन घ्यावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

पुस्तिकेचे प्रकाशन
महापालिकेतर्फे
देण्यात आलेल्या सेवा-सुविधांबाबत जनसंपर्क विभागाने संकलित केलेल्या सचित्र माहिती पुस्तिकेचे प्रकाशन महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते शिवाजी
पार्क मैदानावरील महापालिकेच्या नियंत्रण कक्षातील स्वागत कक्षात शनिवारी करण्यात आले.


चैत्यभूमीवर दाखल झालेल्या अनुयायांकरिता आवश्यक सेवा-सुविधा पुरविण्यात आल्या असून, अनुयायांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. पोलीस विभागाने केलेल्या सूचनांची दखल घेत सहकार्य करावे
- अजय मेहता, आयुक्त

अनुयायांसाठी दर्जेदार नागरी सेवासुविधा पुरविण्यात आल्या आहेत. कोणत्याही प्रकारचे गालबोट न लागता या सेवा-सुविधांचा अनुयायांनी लाभ घ्यावा.
- स्नेहल आंबेकर, महापौर

महापालिकेतर्फे सेवासुविधांचा
व वितरित करण्यात येणाऱ्या माहिती पुस्तिकेचा अनुयायांनी लाभ घ्यावा.
- अलका केरकर,
उप-महापौर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षात इंदू मिलमध्ये डॉ. आंबेडकरांचे स्मारक उभारण्यात येणार आहे.
- राहुल शेवाळे, खासदार

महापरिनिर्वाण दिनासाठी पालिकेने चांगल्या प्रकारच्या सोयी-सुविधा पुरविल्या आहेत. अनुयायांनी त्याचा लाभ घ्यावा. महापरिनिर्वाण दिनानिमित्त काढण्यात आलेली माहिती पुस्तिका ही दर्जेदार व आशयपूर्ण आहे.
- नरेंद्र जाधव,
खासदार व अर्थतज्ज्ञ

Web Title: Mumbai is ready for a great tribute!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.