Join us

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी मुंबई सज्ज! कांदिवलीत अतिदक्षता रुग्णालय अन् जम्बो केंद्रासाठी औषधांची खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 8:51 PM

कोरोनाची तिसरी लाट ऑगस्ट अखेरीपर्यंत मुंबईत धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी महापालिकेने तयारी सुरू केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई - कोरोनाची तिसरी लाट ऑगस्ट अखेरीपर्यंत मुंबईत धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी महापालिकेने तयारी सुरू केली आहे. त्यानुसार कांदिवली येथील ईएसआयएस रुग्णालयातील ६८ खाटांचे अतिदक्षता विभाग तयार करण्यात येणार आहे. तर जम्बो कोविड केंद्रांसाठी औषधांची खरेदी, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प तयार ठेवण्यात येत आहे. या संदर्भातील काही प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी मंजुरी देण्यात आली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार आता पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. मात्र तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीने महापालिकेने गेल्या काही दिवसांपासून तयारी सुरू केली आहे. त्यानुसार औषध खरेदीपासून विविध यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी सुमारे ३६ कोटी रुपयांचे प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजूर करण्यात आले आहेत.

या प्रस्तावांना मंजुरी...

* जम्बो कोविड केंद्रासाठी २० किलो लिटर, १३ किलो लिटर आणि १० किलो लिटर क्षमतेच्या ऑक्सिजन टाक्या उभारुन त्यातून ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी ठेकेदार नेमण्यास पालिकेने परवानगी दिली आहे. यासाठी चार कोटी ८० लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.

* दोनशे लिटर क्षमतेचे ११० पोर्टेबल ऑक्सिजन सिलेंडर खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी दोन कोटी ९० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. तर, जम्बो कोविड केंद्रांसाठी औषध खरेेदी करिता २० कोटी ७२ लाख रुपये खर्च होणार आहे.

* कांदिवली येथे ईएसआयएस रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी अतिदक्षात विभाग तयार करण्यात येत आहे. येथील आवश्‍यक यंत्रणा उभारण्यासाठी पालिका आठ कोटी रुपये खर्च करणार आहे.

चाचणी व अति जोखमीच्या व्यक्तींचा शोध....मुंबईत सध्या सरासरी २८ ते ३० हजार लोकांची कोविड चाचणी केली जाते. पुढील काही दिवसांमध्ये हे प्रमाण वाढवण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. यामध्ये ‘आरटीपीसीआर’ व ‘रॅपिड ऍण्टीजेन’ या दोन्ही प्रकारच्या चाचण्यांचा समावेश आहे. प्रत्येक बाधित रुग्णामागे १५ व्यक्तिंचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात येत होते. हे प्रमाण वाढवून आता प्रत्येक रुग्णामागे २० व्यक्तिंचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात येणार आहे. 

जुलै अखेरीस ३० हजार ३६४ कोविड खाटा उपलब्ध आहेत. यामध्ये १७ हजार ६९७ ऑक्सिजन खाटा, तीन हजार ७८८ अतिदक्षता खाटा, लहान मुलांसाठी एक हजार ४६० खाटा, लहान मुलांसाठीच्या अतिदक्षता कक्षात २३० खाटा आणि नवजात बालकांसाठीच्या अतिदक्षात कक्षात ५३ खाटा उपलब्ध आहेत.     

 

टॅग्स :मुंबईकोरोना वायरस बातम्या