Join us

बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबईकर झाले सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2019 2:48 AM

बाजारपेठांमध्ये उसळली गर्दी । कोकणाकडे जाणाऱ्या गाड्या फुल्ल

मुंबई : गणरायाच्या आगमनासाठी मुंबापुरी सज्ज झाली आहे. मुंबईकरांची खरेदीची लगबग आणि कोकणात जाणाºया चाकरमान्यांची धावपळ असे दृश्य शनिवारी मुंबईत सर्वच भागात होते. लाडक्या गणरायासाठी कंठी, मुकुट, सजावटीच्या साहित्यापासून ते प्रसादाचे लाडू, पेढे मिठाईच्या खरेदीसाठी मुंबईतील मध्यवर्ती समजल्या जाणाºया दादर, तसेच लालबागच्या बाजारपेठा भक्तगणांनी फुलल्या होत्या.

मोठ्या संख्येने भाविक खरेदीसाठी घराबाहेर पडल्यामुळे शहरातील सर्वच रस्त्यांवर वाहतूककोंडी निर्माण झाली. गणेश भक्तांच्या उत्साहापुढे, शिगेला पोहोचलेली महागाईही थिटी पडल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते. शहरातील विविध गणपती मंडळांच्या मंडपात कार्यकर्त्यांची सजावटीसाठी लगबग सुरू आहे, तर काही मंडपांत गणपती बाप्पा आधीच विराजमान झाले आहेत. त्या मंडपांमध्ये सजावटीवर अखेरचा हात फिरवला जात आहे.

रेल्वे-एसटी झाल्या फुल्लगणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी जनशताब्दी, तेजस, लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव डबल डेकर एक्स्प्रेस या गाड्या फुल्ल झाल्या आहेत. एसटी महामंडळानेही कोकणात जाणाºया प्रवाशांसाठी २ हजार २०० जादा गाड्या सोडल्या आहेत. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातून शनिवारी रात्रीपर्यंत मुंबईहून १ हजार ५०० एसटी बस कोकणात रवाना झाल्या. सांघिक आरक्षण जास्त प्रमाणात झाल्याने प्रवाशांच्या सोईसाठी लालबाग, गिरगाव, परळ यासह एकूण १४ ठिकाणी विशेष थांबे एसटी महामंडळाने तयार केले आहेत. सेनापटी बापट मार्गावर सांघिक आरक्षण केलेल्या १५० बस ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या गजरामध्ये कोकणाच्यादिशेने मार्गस्थ झाले आहेत.लाडक्या बाप्पाची आरास करण्यासाठी इकोफ्रेंडली मखर, शंख, स्वस्तिक, घंटा, उंदीर, कंठी अशा वस्तूंची खरेदी सुरू आहे. सजावटीसाठी पडदे, दिव्यांच्या माळांची खरेदी केली जात आहे. इलेक्ट्रिकवर चालणारी दीपमाळ, निरांजन, समई, पणत्यांनी अनेक भक्तांना आकर्षित केले. उदबत्त्या, धूप, कापूर, गुलाल, बुक्का अशा पूजेच्या सामानाच्या वस्तू खरेदी यादीत होत्या. 

टॅग्स :मुंबईगणपती