जिथं जागेच्या किमती गगनाला भिडल्यात असं प्रत्येकाच्या तोंडून ऐकतो अशा मुंबईत आता इमारतींची उंची देखील गगनाला भिडू लागली आहे. मुंबई आणि महानगर प्रदेशातील उंच इमारतींची आकडेवारीच याची प्रचिती देते. एमएमआर परिसरात सध्या ४० मजल्यांहून अधिक उंच अशा १५४ इमारती तयार आहेत. विशेष म्हणजे ही वाढ येत्या ६ वर्षांत ३४ टक्क्यांपर्यंत जाणार आहे.
कोरोनाच्या फटक्यानंतरही एमएमआर परिसतारील गगनचुंबी इमारतींबद्दलची ग्राहकांची ओढ काही कमी झालेली ही. कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. या प्रदेशात सध्या प्रत्येकी ४० मजल्यांहून अधिक उंची असलेल्या एकूण ३६१ टॉवर्शचं काम सुरू आहे. त्यातील १५४ इमारतींचं काम आधीच पूर्ण झालं आहे. तर २०७ हून अधिक इमारतीचं काम येत्या सहा वर्षांमध्ये पूर्ण होणार आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
"गगनचुंबी इमारती ही मुंबईच्या रिअल इस्टेटची ओळखच बनली आहे. जमिनीच्या वाढत्या तुटवड्यामुळे या शहराची उभी भव्यता वाढू लागली आहे. २०१९ ते २०२३ दरम्यान ४० प्लस मजल्यांच्या १५४ उंच इमारती MMR रिजनमध्ये तयार झाल्या आहेत. तर २०२४ ते २०३० या कालावधीत आणखी २०७ इमारतींचं काम पूर्ण होईल. त्यांचं काम आधीच सुरू झालेलं आहे”, असं ANAROCK समूहाचे अध्यक्ष अनुज पुरी यांनी सांगितलं.
उंच इमारतींसाठी कारणीभूत घटकलोकसंख्या वाढ आणि गेल्या दशकात वाढलेली FSI मर्यादा हे या प्रदेशातील गगनचुंबी इमारतींच्या संख्येतील वाढीचे घटक आहेत. तसेच २०१९ मध्ये राज्य सरकारने दोन वर्षांसाठी शहरातील सर्व निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पांसाठी एफएसआय प्रीमियम कमी करून मुंबईच्या अडचणीत असलेल्या रिअल इस्टेट मार्केटला चालना दिली. पुरी म्हणतात, "विकसकांनी या निर्णयाचे साहजिकच स्वागत केले, कारण यामुळे निवासी इमारतींसाठी एक महत्त्वपूर्ण इनपुट खर्च - फ्लोअर स्पेस प्रीमियम २५ टक्क्यांपर्यंत कमी झाला. कमी झालेला एकूण बांधकाम खर्च, उच्च मागणी या गोष्टींनी विकासकांना अधिक उंच उंच इमारीत बांधण्यास प्रवृत्त केलं"