मुंबई खरंच स्वच्छ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 05:30 AM2018-05-18T05:30:22+5:302018-05-18T05:30:22+5:30
राजधानी मुंबईने देशातील स्वच्छतेचा बहुमान पटकावला़ या बहुमानाने पुन्हा एकदा मायानगरीची मान उंचावली़
राजधानी मुंबईने देशातील स्वच्छतेचा बहुमान पटकावला़ या बहुमानाने पुन्हा एकदा मायानगरीची मान उंचावली़ आता हा बहुमान आमच्याचमुळे मिळाला याचे श्रेय लाटण्यासाठी राज्य व महापालिकेतील सत्ताधारी यांच्यात रस्सीखेच सुरू होईल़ राजकारण्यांनी अशा श्रेयवादात न पडता मुंबई अधिक स्वच्छ व सुंदर कशी होईल, याचा खरे तर स्वच्छ मनाने विचार करायला हवा़ मुंबईची भौगोलिक रचना अशी आहे, की या शहरात हवेचे प्रदूषण अधिक काळ टिकत नाही़ या शहराला ऐतिहासिक व वैचारिक वारसा आहे़ स्चच्छतेविषयी जनजागृती करताना प्रशासनाला इतर शहरांच्या तुलनेने कमी मेहनत घ्यावी लागली असावी़ तरीही इतर स्वच्छ राजधान्यांपेक्षा मुंबई कशी सरस ठरली, हे औत्सुक्याचे आहे़ स्वच्छतेचा बहुमान मिळाला असला तरी मुंबईकर जागोजागी अस्वच्छतेचा भयाण अनुभव घेत असतात़ सार्वजनिक शौचालयातील, मुताऱ्यांमधील अस्वच्छता अजूनही जैसे थेच आहे़ अगदी उदाहरणासह सांगायचे म्हटले तर दादरच्या वीर कोतवाल उद्यानाशेजारी असलेल्या शौचालयातील मुतारी सदैव अस्वच्छ असते़ मुंबईतील दादरसारख्या ठिकाणी असलेल्या शौचालयात दुर्गंधी असेल तर शहरातील झोपडपट्टी भागात असलेल्या शौचालयांची काय अवस्था असेल याचा अंदाज न घेतलेलाच बरा़ न्यायालयानेही स्वच्छतेसाठी वारंवार राज्य शासन व पालिकेचे कान उपटले आहेत़ रेल्वे रुळालगतच्या झोपड्यांना हटविण्याचे आदेश न्यायालयाने दिले़ त्याचा परिणाम रेल्वे रुळावर शौचासाठी जाणाºयांची संख्या आपोआप कमी झाली़ हार्बर मार्गावरील रुळाजवळ असलेल्या झोपड्या हटविण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे़ ही कारवाई सर्व तिन्ही मार्गांवर प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. महत्त्वाचे म्हणजे रुळावर शौचास जाणाºयांवर कारवाई करण्यात संबंधित प्रशासन उदासीन असल्याचे चित्र आहे़ झोपडपट्टीधारकांनी उघड्यावर शौच न करता शौचालयाचा वापर करावा याच्या जनजागृतीसाठी पालिकेने सलमानला स्वच्छता दूत म्हणून नेमले़ त्यानंतर उघड्यावर शौचाला जाण्याचे प्रमाण कमी झाले, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला़ हा दावा कसा फोल आहे हे माध्यमांनी दाखवून दिले़ तरीही मुंबईला स्वच्छतेचा मिळालेला मान कौतुकास्पद म्हणायला हवा़ याचा दुसरा अर्थ असा की, अन्य राजधान्यांची स्वच्छतेची स्थिती अत्यंत गंभीर आहे़ या बहुमानावर खूश न होता मुंबई प्रशासनाने हे लोकप्रिय महानगर स्वच्छतेच्या लौकिकाला साजेसे करावे, ही अपेक्षा तूर्त बाळगायला हरकत नाही़