मुंबई : मुंबईत कोसळधारेचा मारा सुरुच असून, शुक्रवारी सकाळी आठच्या नोंदीनुसार मुंबईत १५५.४ मिलीमीटर एवढा पाऊस पडला आहे. मुसळधार पावसाची नोंद होत असतानाच १७ ठिकाणी झाडे कोसळली. १३ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. तर ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडत असतानाच सकाळी बरसलेल्या मुसळधार पावसाने शुक्रवारी सकाळी ११ वाजता विश्रांती घेतली. अधून-मधून कोसळत असलेला पाऊस दुपारी ४ नंतर मात्र आणखी जोर धरू लागला. आणि सायंकाळी साडेचारनंतर सुरु झालेल्या पावसाने मुंबईच्या उपनगराला झोडपून काढले. दरम्यान, १८ आणि १९ जुलै रोजी मुंबई शहर आणि उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहील. हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. गुरुवारसह शुक्रवारी मुंबई शहर आणि उपनगराचा पावसाचा धिंगाणा सुरु असतानाच शुक्रवारी सकाळी सांताक्रूझ, कुर्ला, वांद्रे, दहिसर, सायनसह उपनगरात ठिकठिकाणी पावसाच्या मुसळधार सरी कोसळल्या. दुपारी काही काळ पावसाने विश्रांती घेतली. मात्र कुठे तरी पावसाची एखादी मोठी सर येत होती. सायंकाळी पाच नंतर पूर्व उपनगरात पावसाने पुन्हा एकदा जोर पकडला. आणि कुर्ला, वांद्रे, सांताक्रूझ, घाटकोपर, साकीनाका, विद्याविहारसह लगतच्या परिसरात पावसाच्या मुसळधार सरी कोसळल्या. गुरुवारी रात्री साकिनाका येथील खाडी नंबर ३ येथे दरडीची माती १० ते १५ पत्र्याची शेड असलेल्या घरांवर पडली. घरे रिकामी असल्याने कुणालाही मार लागला नाही. गुरुवारी सायंकाळी वांद्रे येथील भारत नगरमधील नाल्यात पोहण्यास गेलेल्या ४ मुलांपैकी २ मुलांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. तर उर्वरित २ पैकी व्हि.एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या आकाश नरेश अडिवाल या मुलाची प्रकती स्थिर असून, आशिष बनारसी सावंत या मुलाचा शोध सुरु आहे. गुरुवारी सायंकाळी भांडूप संकुल येथे विहार तलावात एक जण बुडाला. या व्यक्तीचाही शोध सुरु होता. शुक्रवारी दुपारी त्याचा शोध लागून त्यास येथील अग्रवाल रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालय प्रशासनाने यास मृत घोषित केले. प्रभू किसन भोये (२२) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे.