Join us

मुंबईत रविवारी ११९ मिलीमीटर पाऊस;  ठाणे, पालघरसह रायगडमध्ये मुसळधार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2019 1:34 AM

या पावसामुळे गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी घराबाहेर पडलेल्या भक्तांची धावपळ उडाली होती.

मुंबई : मुंबईत रविवारी कोसळलेल्या पावसाची ११९ मिलीमीटर एवढी नोंद झाली आहे. सोमवारी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.

गेल्या २४ तासांत पडलेल्या पावसामुळे हिंदमाता, सायन, प्रतीक्षानगर, अ‍ॅन्टॉप हिल, गांधी मार्केट, चेंबूर येथील शेल कॉलनी, चुनाभट्टी, वांद्रे येथील नॅशनल कॉलेज, मोतीलालनगर, ठाकुर गाव येथे पाणी साचले होते. पाऊस कोसळत असतानाच पडझडीच्या घटना घडल्या. ६ ठिकाणी बांधकामाचा भाग पडला. २७ ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या. २२ ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्या. गेल्या कित्येक दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरात सुरू असलेल्या पावसाचा धिंगाणा कायमच आहे. रविवारच्या सुट्टीच्या दिवशीही पाऊस तुफान कोसळला

या पावसामुळे गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी घराबाहेर पडलेल्या भक्तांची धावपळ उडाली होती. तर दुसरीकडे नेहमीप्रमाणे सखल भागात साचलेल्या पाण्याने मुंबईकरांची किंचित तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

रस्ते वाहतुकीचा खोळंबामुंबईत शनिवारी रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. या मुसळधार पावसामुळे सकाळी अनेक ठिकाणी पाणी साचून रस्ते वाहतुकीचा बोजवारा उडाला. यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी झाली. सरकार पंचायत मार्ग, आरएके मार्ग, वडाळा स्थानक, पोस्टल कॉलनी, महाराष्ट्रनगर मानखुर्द, शिवाजी चौक, सायनमध्ये माळा उद्यान, सुंदर विहार हॉटेल आदी भागांत पाणी साचले, तर गोवंडी येथे निकम जंक्शन पाणी भरले होते. त्याचप्रमाणे, महालक्ष्मी जंक्शन, बी. डी. रोड, केशवराव खाडे रोड, बलराम स्ट्रीट, ग्रॅण्ट रोड या ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला, तसेच मुलुंड चेकनाका ते मुलुंड स्थानक पूर्णपणे ठप्प झाला होता. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरही कोंडी होती. दहिसर टोलनाक्यापूर्वी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काही काळाने ही वाहतूक पूर्ववत झाली.

टॅग्स :पाऊस