मुंबई : उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना श्रावण सरी अपेक्षित असतानाच पावसाची गुरुवारी सकाळपासून संततधार सुरू झाली. शुक्रवारी दुपारी २ ते ३ यादरम्यान मुंबईत ठिकठिकाणी कोसळलेल्या पावसामुळे पाणी तुंबले होते. मात्र, पावसाने काही काळासाठी विश्रांती घेतल्याने पाणी ओसरू लागले. गेल्या २४ तासांत सांताक्रूझ वेधशाळेत १११.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, कुलाबा वेधशाळेत ५०.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
गेल्या ४८ तासांपासून मुंबई शहर आणि उपनगरांत पावसाचा धिंगाणा सुरू असतानाच हवामान खात्याने मुंबईला शुक्रवारी ऑरेंज अलर्ट दिला आणि पाऊस धोधो कोसळला. विशेषत: दुपारी शहर व उपनगरांत पडलेल्या तुफान पावसामुळे मुंबईचा चक्का जाम होतो की काय, असे चित्र निर्माण झाले. मात्र, पावसाने चारनंतर हात आखडता घेतला आणि मुंबईकर थोडक्यात बचावले. दरम्यान, अंधेरी सब वे येथे काही काळ दुपारी पाणी साचले होते. उदंचन संचाद्वारे पाण्याचा निचरा करण्यात आला आणि वाहतूक सुरू झाली.
कुठे पडला किती पाऊस? गोवंडी ९६ मिमीमालवणी ७६ चिंचोळी ७४ मरोळ ७० गोरगाव ६८चेंबूर ६० विक्रोळी ५९ कुर्ला ५४