जगातील सर्वात मोठ्या शहरांमध्ये गणल्या जाणाऱ्या मायानगरी मुंबईने मोठा विक्रम केला आहे. कोरोनावर मात केलेली असताना एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पहिला डोस देण्यात यश मिळविले आहे. महत्वाचे म्हणजे 10 महिन्यांतच मुंबईने हे लक्ष्य गाठले आहे.
मुंबईत आज 18 वर्षांवरील वयोगटातील 100 टक्के नागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट गाठले आहे. शनिवारी सकाळी मुंबईत 92 लाख 36 हजार 500 वी लस देण्यात आली. याचबरोबर सर्व नागरिकांना पहिला डोस दिला गेला आहे.
मुंबईची अवाढव्य लोकसंख्या पाहता हे लक्ष्य एवढे लवकर गाठणे कठीण होते. यासाठी मुंबई महापालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मिळून प्रयत्न केले. लसीचा तुटवडा असताना तसेच केंद्र सरकारने राज्यांवर लसी विकत घेण्याची जबाबदारी टाकलेली असताना मुंबई महापालिकेने स्वत: लसी विकत घेण्याची तयारी केली होती. तसेच लसीकरणाची मोठी मोहिम राबविली होती.
मुंबईसह देशभरात 16 जानेवारीला लसीकरण मोहीम सुरु झाली. सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण सुरु झाले होते. त्यानंतर फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांसाठी 5 फेब्रुवारी 2021 ला 60 वर्ष वयावरील तसेच 45 ते 59 वयोगटातील सहव्याधी असलेल्या नागरिकांसाठी 1 मार्च, 45 वर्ष वयावरील सर्व नागरिकांसाठी 1 एप्रिल 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी दिनांक 1 मे 2021 पासून लसीकरण सुरु करण्यात आले.